Marathi News : Ayan Khan From Karanja Drowned In Britain Body Brought To India After Complex Procedure Sud अकोला दिव्य न्यूज : वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील मूळचा तरुण अयान खान याचा ब्रिटनमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला. अत्यंत अवघड व गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर पार्थिव भारतात आणि त्यानंतर कारंजा येथे आणण्यात आले. अयानवर १४ व्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘रोबोटिक्स टेक्नॉलॉजी’चा उदयोन्मुख तारा अयान खानला रविवारी कारंजावासियांनी अश्रूपूर्ण नयनांनी अंतिम निरोप दिला. यासाठी हिंदू-मुस्लिमांचा जनसागर एकोप्याने लोटला होता.

कारंजा येथील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘टेक्नॉलॉजिस्ट’ अयान खानचा २५ ऑगस्टला ब्रिटनमधील एडिनबर्ग शहराजवळील हारलौ जलाशयात बुडाल्याने मृत्यू झाला होता. याचे वृत्त कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. संपूर्ण कारंजा शहर शोकसागरात बुडाले. अयानचे पार्थिव भारतात आणण्याचे मोठे आव्हान होते. स्कॉटलंडमधील गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अयानचे नातेवाईक जावेद खान, अरशान खान, रोमान खान यांनी पोलीस अधिकारी जेनिफर, भारतीय दूतावासाचे अधिकारी नेगी व हेरियट विद्यापीठाचे डायरेक्टर पॉवेरी कॅम्पबेल यांच्याशी आभासी पद्धतीने संपर्क साधला. प्रयत्नांनंतर प्रक्रिया पूर्ण झाली आणि पार्थिव भारतात पाठविण्यात आले.
.संपूर्ण प्रक्रियेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार सई डहाके, भाजप नेते देवव्रत डहाके, मुख्यमंत्री यांचे खासगी सहसचिव अमोल पाटणकर, श्याम देशमुख, एआयएमआयएम नेते मो. युसुफ पुंजानी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्रालयाने यात महत्त्वाची भूमिका बजावली. रविवारी पहाटे २.४० वाजता कतार विमानाने अयानचे पार्थिव नागपूर विमानतळावर दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहाटे ४.३० वाजता कुटुंबीयांच्या ताब्यात पार्थिव देण्यात आले. नागपूरहून रुग्णवाहिकेतून सकाळी ८ वाजता पार्थिव कारंज्यात पोहोचले. अंतिम दर्शनासाठी हजारो हिंदू-मुस्लिमांची गर्दी जमली होती. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूरसह अनेक शहरांतील नागरिक सहभागी झाले होते.