अकोला दिव्य न्यूज : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….चा घोष ढोल-ताशांचा गजर, गणेश मूर्ती विसर्जनाचा उत्साह आणि बाप्पाला निरोप देण्याची लगबग अशा भक्तीमय वातावरणात शहरात घडलेल्या घटनेने शहर हादरले. सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. मुर्ती विसर्जनासाठी कुटुंब बाहेर गेल्यावर घरात एकटी राहिलेल्या 16 वर्षीय मुलीवर चाकूच्या धाकावर बलात्कार करण्यात आला.या प्रकारानंतर जुने शहरातील वातावरण संतप्त झाले.डाबकी रोड पोलीसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

अशी घडली घटना : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. एकटीच असलेल्या पीडितेच्या घरात तौहिद समीर बैद हा आरोपी थेट घुसला. त्याने मुलीला धमकावले आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मुलीचा मानलेला भाऊ तेथून जात असताना आवाज ऐकून घराजवळ थांबला. त्याने आत डोकावून विचारणा केली, पण आरोपीने तत्काळ चाकू काढून त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. काही क्षणांतच शेजारची मंडळीही धावून आली, पण आरोपीने सर्वांना घाबरवत मुलीला आपल्या तावडीत ठेवले.
मुलगी सुटली पण…
आरोपीच्या ताब्यातून कशीबशी सुटलेली मुलगी शेजारील घरात लपली. परंतु आरोपी तिच्या मागेच धावून गेला आणि पुन्हा तिला चाकूचा धाक दाखवत जबरी अत्याचार केला. केवळ 16 वर्षांच्या या तरुणीच्या जीवाशी खेळून आरोपीने धमकी दिली… घडलेलं सांगशील तर तुझ्या आई-वडिलांनाही जिवंत ठेवणार नाही.
पोलिसांत गुन्हा दाखल
पीडितेची आई घरी आल्यानंतर मुलीने सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. डाबकी रोड पोलिसांनी आरोपी तौहिद समीर बैद याच्याविरुद्ध बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.