अकोला दिव्य न्यूज : भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा समारोप काल शनिवार, ६ सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात झाला. भर पावसातही भक्तांच्या उत्साह कमी झाला नव्हता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या ठेक्यावर आणि गुलालाच्या उधळणीत गणपती बाप्पाला निरोप दिला. गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सेलिब्रिटी सरसावले.

अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
आज ७ सप्टेंबर रोजी अक्षय कुमार, अमृता फडणवीस आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी एकत्र येत जुहू चौपाटीवर ‘Sea Shore Shine’ हे स्वच्छता अभियान राबवले. यावेळी अमृता यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. विसर्जनानंतर किनाऱ्यावर जमा झालेले निर्माल्य, डेकोरेशनचे साहित्य आणि इतर कचरा त्यांनी गोळा केला. या अभियानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या, आपले समुद्र आणि किनारे कचऱ्याने नव्हे, तर स्वच्छतेने चमकले पाहिजेत. हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नसून, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम आहे. जर आपल्याला आपला वारसा पुढच्या पिढीला स्वच्छ आणि सुंदर सोपवायचा असेल, तर आपण घाण करणे थांबवले पाहिजे आणि ती साफ करण्याची जबाबदारीही घेतली पाहिजे”. अमृता यांनी समाजातील प्रत्येक वर्गाला या कामात पुढे येण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “जर स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पसरवायचा असेल, तर नेते, अभिनेते किंवा व्यावसायिक असे प्रत्येक वर्गातील लोकांनी यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समाजाने एकजुटीने काम केले तर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य आणि स्वच्छता राखणे खूप सोपे होईल.

या मोहिमेत सहभागी झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस हिनेही आपले विचार व्यक्त केले. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मला माझा सुंदर समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. पण जेव्हा मी समुद्रकिनाऱ्यावर बाप्पांच्या मूर्तींचे तुटलेले हात आणि पाय पाहिले, तेव्हा मला खूप वाईट वाटले.
यावेळी दिविजाने सर्वांना पर्यावरणपूरक गणपती स्वीकारण्याचे आवाहन केले. ती म्हणाली की, “निसर्ग आणि स्वच्छतेशी जोडून आपल्या परंपरांचे पालन करणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.