अकोला दिव्य न्यूज : Maharashtra Railway Accident: पुणे-अमरावतील रेल्वेतून उतरत असताना एका प्रवाशाचा पाय घसरला. प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेस गाडीमध्ये अडकलेला प्रवाशाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले.

पुणे-अमरावती एक्स्प्रेस अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आली. गाडी थांबत असतानाच एक प्रवाशी उतरू लागला. पण, अंदाज चुकला आणि त्याचा तोल गेला. प्रवाशी घसरून प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेस गाडीच्या मध्ये पडला आणि अडकला. त्यानंतर दीड तास त्याला सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सोमवारी (१६ सप्टेंबर) सकाळी पुणे-अमरावती एक्स्प्रेस मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर आल्यानंतर ही घटना घडली. मुस्ताक खान मोईन खान असे रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो अकोल्याचा आहे. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन पुणे अमरावती एक्स्प्रेस आली. त्यावेळी मुस्ताक खान उतरू लागला. पण, त्याचा तोल सुटला आणि रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाऊन तो अडकला.
तो पडल्यानंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. तातडीने जय गजानन आपत्कालीन पथकाला बोलावण्यात आले. मुस्ताक रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये घट्ट अडकलेला होता. त्यामुळे पथकाने गॅस कटरच्या मदतीने रेल्वेचे पायदान कापले आणि त्याला बाहेर काढले.
प्रवाशी गंभीर जखमी
प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकलेला प्रवाशी या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. मुस्ताक खानच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशी अडकल्यामुळे पुणे-अमरावती एक्स्प्रेस स्थानकातच खोळंबली होती. १ तास २० मिनिटे गाडी उभी होती. इतका वेळ गाडी थांबल्याने गोंधळ उडाला होता.