आयुष मंत्रालय व राज्य शासनाचे शिक्कामाेर्तब : सुसज्ज इमारत, आधुनिक रूग्णालय व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अकोला दिव्य न्यूज : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला बीएएमएस अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. पश्चिम विदर्भातील “एज्युकेशन हब” म्हणून उदयास येत असलेल्या अकोल्याच्या शैक्षणिक विश्वात या वैद्यकीय महाविद्यालयाने मानाचा तुरा खोवला आहे.

भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांनी १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसाठी मान्यता (LoP) प्रदान केली असून, राज्य शासनाने त्यानुसार परवानगीचा आदेश जारी केला आहे. ही मान्यता कायम विनाअनुदान स्वरूपात देण्यात आली असून, प्रवेश प्रक्रिया व शुल्क संरचना शासन व नियामक प्राधिकरणाच्या नियमांनुसारच पार पाडली जाणार आहे.
श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ संचलित शेगाव मार्गावर साकारण्यात आलेले हे महाविद्यालय अत्याधुनिक व सुसज्ज इमारतीसह विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवते. १०० खाटांचे सुसज्ज रूग्णालय, नियमित ओपीडी, पंचकर्म केंद्र, आधुनिक उपकरणे व आयुर्वेद उपचारतज्ज्ञांची सेवा येथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी अनुभवी प्राध्यापक मंडळींची नेमणूक करण्यात आली असून, याचा थेट लाभ पहिल्याच शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांच्या कुशल नेतृत्व व दूरदर्शी मार्गदर्शनाखाली समर्थ शैक्षणिक परिवाराने आजवर सातत्याने प्रगती साधली आहे. पब्लिक स्कूल, सीबीएसई व स्टेट बोर्डचे ज्युनिअर कॉलेज, नर्सिंग कॉलेज अशा विविध संस्थांनंतर आता बीएएमएस महाविद्यालयाची भर पडल्याने समर्थ परिवाराचा शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध झाला आहे.
बीएएमएस दूसऱ्या राऊंडसाठी संधी
श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमुळे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद शिक्षणाचा नवा मार्ग खुला झाला असून, या भागातील वैद्यकीय शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे. याच शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना बीएएमएस च्या दूसऱ्या राऊंडमध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी आहे.
आराेग्य विद्यापीठाची संलग्नता
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, अकोला संचालित श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, रिधोरा (ता. बालापूर, जि. अकोला) यांना संलग्नता मंजूर केली आहे. स्थानिक तपासणी समितीचा अहवाल आणि अकादमिक कौन्सिलच्या ठरावानंतर कुलगुरूंनी ही मान्यता दिली.
आमच्या श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला आयुष्य मंत्रालय, राज्यशासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता मिळणे हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. आमचे ध्येय आयुर्वेद शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम व सेवाभावी डाॅक्टर घडवणे आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करून दर्जेदार शिक्षण व सुविधा उपलब्ध करून देऊ. हे महाविद्यालय आमच्यासाठी प्रेरणा असून, समाजाच्या आरोग्यसेवेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे असे आम्ही मानताे.
प्रा.नितीन बाठे, संस्थापक अध्यक्ष
