Thursday, September 18, 2025
HomeUncategorizedनिरंतर 25 वर्ष ! सहकार विद्या मंदिर व बुलढाणा अर्बन यांनी मूल्य...

निरंतर 25 वर्ष ! सहकार विद्या मंदिर व बुलढाणा अर्बन यांनी मूल्य संवर्धनासह चांगला ‘पाल्य’ घडवून आणले

अकोला दिव्य न्यूज : ‌सांस्कृतिक वारसा, मूल्यसंवर्धन व चांगला पाल्य घडविण्याचे कार्य केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व बुलडाणा अर्बन सातत्याने करीत आहेत. त्याचबरोबर सहकार म्हणजे सभासदांच्या हितासाठी व फायद्यासाठी आहे. असे मत मल्टीस्टेट बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

स्थानिक जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरच्या २५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप रौप्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी मंचावर आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था बुलडाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर, माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगांव जामोद मतदार संघांचे आमदार डॉ.संजय कुटे, लोकमत कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्ष ओमप्रकाश केला, ज्येष्ठ संचालक डॉ. किशोर केला, किसनलालजी केला, स्त्री शिक्षण संस्था धुळेचा अध्यक्षा श्रीमती अलका बियाणी, सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ.स्वाती केला, डॉ.दलाल उपस्थित होते.

बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष व सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शाळेच्या रौप्य महोत्सवकरिता आभासी पद्धतीने उपस्थित राहून राधेश्याम चांडक उपाख्य भायजी यांनी शुभेच्छा दिल्या.

सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे डिजिटल उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिराने २५ वर्षाचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल डॉ. कुटे यांनी शुभेच्छा देताना विविध क्षेत्रात लोकांना पुढे जाण्यासाठी बुलडाणा अर्बनची मदत झाली आहे. असे आवर्जून सांगितले.तर २५ वर्षांपूर्वी सहकार विद्या मंदिराचे लावलेले रोपट आज नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करून पुढे जात आहे, असे मत संस्थेचे जेष्ठ संचालक डॉ. किशोर केला यांनी व्यक्त केले.

प्रमुख अतिथी आणि स्त्री शिक्षण संस्था धुळेच्या अध्यक्षा अलका बियाणी यांनी मार्गदर्शनातून विविध उपक्रमा बद्दल शाळेचा गौरव करून २५ वर्षे झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकेतून डॉ. सौ.स्वाती केला यांनी शाळेच्या सर्व वैशिष्ट्यांची माहिती देताना शाळेची २५ वर्षे पूर्ण झाल्याचे व पाहण्याचे भाग्य भाईजींमुळे मिळाले असे सांगितले.यावेळी बुलडाणा अर्बन चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आला. परिसरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनेक विद्यार्थी ,शिक्षक ,आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक यांनी शाळेविषयी आपुलकी व्यक्त करण्यास तयार केलेल्या ‘रजत स्मरणदीप- २५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप’ या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे दालनाचे उद्घाटन करण्यात आले. विविध प्राचीन अर्वाचीन भांड्यांची ओळख व्हावी यासाठी ‘भांड्यांची दुनिया’ दालन, नादब्रह्म यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध म्युझिकल इन्स्ट्रुमेंट स्वतःच्या हाताने बनवलेले होते, कृतीयुक्त शिक्षणासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टीचिंग एड्स, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध हस्तकला तयार केल्या त्याला कला विश्व असं नाव दिले होते. मान्यवरांनी या नाविन्यपूर्ण कला कृतींबद्दल विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.


कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात क्रीडा ज्योत यामध्ये विद्यार्थ्यांनी परेड, लाठी काठी ,कराटे, डंबेल, योगा, बलून ड्रिल, स्ट्रीक ड्रिल , मनोरा अशा विविध पद्धतीच्या मनमोहक कवायती सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.

यानंतर ‘रंगतरंग सांस्कृतिक ज्योत’ यामध्ये विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणारे नृत्य, नाटिका सादर केल्या. मुख्य आकर्षण म्हणजे शाळेची २५ वर्षाची गाथा सहकार संकुलाच्या मुख्य सौ.डॉ.स्वाती केला लिखित ‘सहकार पोवाडा’ मधून सहकार विद्या मंदिराची निर्मिती व कार्य शिक्षक व विद्यार्थ्यांनी उलगडून दाखवला. यावेळी बुलडाणा अर्बन खामगाव विभागीय व्यवस्थापक प्रकाश सावळे, केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य विनायक उमाळे, प्राचार्य प्रकाश भुते, प्राचार्य विनोद ईश्वरे, प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य रविंद्र घायल, प्राचार्य योगेश घाटोळे, सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बुलढाणा अर्बन संस्थेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन शिक्षक साकेत गिरजापुरे, सौ.स्वाती वैष्णव, वैष्णवी चतारे यांनी केले. शाळेतील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. भव्य, तेजस्वी, अविस्मरणीय, प्रेरणादायी व उल्लेखनीय असा हा सोहळा सर्वांच्या मनात कायमस्वरूपी कोरला जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!