Saturday, August 30, 2025
HomeUncategorizedबुलढाणा विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह ? जयश्री शेळकेंची हायकोर्टात धाव

बुलढाणा विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह ? जयश्री शेळकेंची हायकोर्टात धाव

अकोला दिव्य न्यूज : महाविकास आघाडीमधील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदानाची फेरमोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

या मतदारसंघामधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार संजय गायकवाड हे विजयी झाले आहेत. त्यांना ९१ हजार ६६०, तर शेळके यांना ९० हजार ८१९ मते मिळाली. शेळके केवळ ८४१ मतांनी पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. निवडणुकीत अनियमितता झाली. मतदार यादीमध्ये ३ हजार ५६१ बोगस मतदारांचा समावेश होता.

अनेकांची नावे दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी होती. अनेक ठिकाणी मृत मतदारांच्या नावावर मतदान करण्यात आले. परिणामी, सर्व इव्हीएम न्यायालयात आणून न्यायालयासमक्ष फेरमोजणी करण्यात यावी, असे शेळके यांचे म्हणणे आहे.

शेळके यांनी गायकवाड यांच्याविरूद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. गायकवाड यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ अंतर्गत अर्ज दाखल करून ही निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी न्यायालयाला केली आहे. शेळके यांनी या अर्जालादेखील प्रत्युत्तर दिले आहे.

गायकवाड यांचा अर्ज गुणवत्ताहीन व निराधार आहे. त्यामुळे निवडणूक याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देण्यात यावा, अशी विनंती शेळके यांनी न्यायालयाला केली आहे.

…या कागदपत्रांची मागणीही केली
बुलढाणा मतदारसंघाची मतदारयादी, सर्व बुथवरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाड यांचे निवडणूक विजयाचे प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही मागणी शेळके यांनी केली आहे. त्याकरिता त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. शेळके यांच्यातर्फे अॅड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!