अकोला दिव्य न्यूज : एका वर्षासाठी संधी मिळाली असताना दोन वर्ष उलटले तरी राजीनामा न देणाऱ्या महाविकास आघाडीच्या बाजार समिती सभापतींविरोधात महायुतीच्या १४ संचालकांनी नुकताच अविश्वास आणला होता. त्यानंतर बहुतांश संचालक सहलीवर रवाना झाले होते. प्रत्यक्षात, सभापतीपद आपल्याकडे खेचून शिवसेनेने (उद्धव ठाकरे) महायुतीला जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले. भाजप आणि शिंदे गटावर हात चोळत बसण्याची वेळ आली.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पॅनेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तत्कालिन नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ जागांपैकी ११ जागा जिंकून शिंदे गटाला चांगलीच धुळ चारली होती.
तेव्हा पासून बाजार समितीवर माजी मंत्री देवकर यांच्या मर्जीतील श्यामकांत सोनवणे हेच सभापती म्हणून कार्यरत होते. मात्र, देवकर हे शरद पवार गट सोडून नुकतेच अजित पवार गटात आल्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला. सभापती सोनवणे यांना पायउतार करून त्यांच्यासह उपसभापतीपदावर महायुतीचे उमेदवार बसविण्याच्या हालचालींना वेग आला. त्या दृष्टीने बाजार समितीच्या सभापती- उपसभापतींची नावेही महायुतीने आधीच निश्चित करून ठेवली होती. परंतु, कोणाच्या ध्यानी मनी नसताना ठाकरे गटाने ऐन निवडणुकीच्या दिवशी मोठी खेळी खेळली. सभापतीपदासाठी बाजार समितीच्या १७ पैकी तब्बल १५ संचालकांनी ठाकरे गटाचे उमेदवार सुनील महाजन यांना मते दिली. परिणामी, महायुतीच्या मनसुब्यांवर सपशेल पाणी फिरले.
दरम्यान, बाजार समितीच्या सभापतीपदी आरूढ झाल्यानंतर सुनील महाजन यांनी तिन्ही मंत्र्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याचे म्हटले. मात्र, त्यांच्या निवडीचे मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे किंवा रक्षा खडसे यांनी किंवा महायुतीच्या एकाही आमदार-खासदाराने स्वागत केले नाही. यावरून बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक महायुतीला किती जिव्हारी लागली आहे, त्याचा अंदाज येतो. अचानक असा काय चमत्कार झाला की ठाकरे गटाने बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले, त्याची कारणे आता महायुती शोधत आहे.