अकोला दिव्य न्यूज : देवी अहिल्या विद्यापीठात आयोजित वादविवाद स्पर्धेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच माननीय, रथीमहारथी एका विद्यार्थ्यानं मांडलेल्या बिनतोड मुद्द्यांनी अचंबित झाले. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांचा लेक संघमित्र यानं केलेलं भाषण व्हायरल झालं आहे.

संघमित्रनं त्याच्या भाषणातून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव , विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर, मंत्री तुलसी सिलावट, खासदार शंकर केसवानी, स्थानिक भाजप आमदार उपस्थित होते. संघमित्रचं भाषण ऐकताना भाजपचे नेते काहीसे अवघडले.

संघमित्रनं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारचे वाभाडे काढले. त्याच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्याच्या धाडसाचं कौतुक केलं.संघमित्रनं त्याच्या भाषणात रेल्वेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं. ‘सरकार म्हणतं, सबका साथ, सबका विकास. पण रेल्वेतील परिस्थिती, वास्तव वेगळं आहे. तिथे केवळ दलालांची साथ आणि जनतेचा विनाश.

वेटिंग लिस्टची परिस्थिती तर अशी आहे की दर वर्षी ५० लाखांहून अधिक जण तिकीट खरेदी करुनही प्रवास करु शकत नाहीत. २०२२ पर्यंत अहमदाबाद-मुंबईच्या दरम्यान बुलेट ट्रेन चालवणा र होते. तशी घोषणा केलेली होती. पण आता २०२५ उजाडलंय. पण बुलेट ट्रेन काही दिसत नाही. कोट्यवधी रुपये खर्च झाले. जमीन अधिग्रहणात घोटाळे झाले. पण ट्रेन केवळ पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनपर्यंतच मर्यादित आहे,’ अशा शब्दांत संघमित्रनं रेल्वेच्या कारभारावर सडकून टीका केली.

रेल्वेच्या कवच तंत्रज्ञानावरही संघमित्रनं भाष्य केलं. कवच तंत्रज्ञानानं अपघात कमी होतील, असं सांगण्यात आलं होतं. पण गेल्या १० वर्षांत २० हजार जणांचा ट्रेन अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. जेव्हा रेल्वेचे डबे रुळांवर घसरतात तेव्हा केवळ लोखंडाचे डबे घसरत नाहीत, तर एखाद्या आईचं लेकरु तिच्यापासून कायमच हिरावतं. एखाद्या मुलाचं भविष्य अंधारात लोटलं जातं. एखाद्या वृद्ध बापाचं अखेरची आशा मावळते, अशा शब्दांमध्ये संघमित्रनं रेल्वे अपघातांचे हृदयद्रावक परिणाम सांगितले.

मोदी सरकारकडून रेल्वे स्थानकांच्या पुनर्बांधणीचं काम जोरात सुरु आहे. त्यावरूनही संघमित्रनं तोफ डागली. ‘४०० रेल्वे स्थानकं विमानतळांसारखी केली जाणार होती. पण आतापर्यंत किती स्थानकांचं काम पूर्ण झालं? फक्त २०! तिथेही चमचमणारे बोर्ड दिसतात. पिण्याचं पाणी महागलंय आणि गर्दीची स्थिती जैसे थे आहे,’ असं म्हणत संघमित्रानं उपस्थित असलेल्या सरकारमधील रथीमहारथींना वास्तवाची सफर घडवून आणली.

कॅगच्या अहवालातील आकडेवारीचा हवाला देत महापौर पुत्रानं सरकारची पोलखोल केली. ‘सव्ला लाख कोटींचं बजेट रेल्वेला मिळालं होतं. पण ८० टक्के योजना आजही अपूर्ण आहेत. ७८ टक्के निधी सुरक्षेसाठी होता. तो वळवण्यात आलेला आहे. ३०० कोटींची गुंतवणूक तर एकाच कंपनीला देण्यात आलेली आहे. मग सबका विकास कसा होणार?’ असा सवाल त्यानं उपस्थित केला.
