Thursday, September 11, 2025
HomeUncategorizedनागपुरात रात्री ८ वाजता व्यापाऱ्यावर गोळीबार ! ५० लाखांची लूट

नागपुरात रात्री ८ वाजता व्यापाऱ्यावर गोळीबार ! ५० लाखांची लूट

अकोला दिव्य न्यूज : नागपूर येथील कडबी चौकातील भर रस्त्यात व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याच्याजवळील जवळपास ५० लाखांची रक्कम लुटून पळ काढला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ८ वाजता घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे. संबंधित रक्कम हवालाशी निगडीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘ऑल इज वेल’चे दावे करण्यात येत असले तरी शहरात गुंडांची हिंमत वाढत असल्याचेच चित्र आहे.

राजू दिपानी (जरीपटका) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ते व्यापारी असून गुजरातमधील एका कंपनीसाठीदेखील डेटा फिडिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे १० नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास ते कार्यालयातून निघाले व चौकातून आतील भागात शिरले. तेथे बाबा नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरून ते दुचाकीने जात असताना मोटारसायकलवरून दोन आरोपी आले व त्यांनी दिपानी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात स्प्रे पाहून दिपानी यांनी धोका ओळखून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाने तीन गोळ्या झाडल्या.

यामुळे दिपानी खाली पडले. त्यांच्याजवळील पैशांची बॅग घेऊन आरोपींनी पळ काढला. गोळ्यांचा आवाज ऐकून वस्तीतील लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दिपानी यांच्या पाठीला गोळी लागली होती. जरीपटका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले व जखमी दिपानी यांना मॅक्स इस्पितळात दाखल करण्यात आले. यानंतर तेथे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील दाखल झाले. याशिवाय फॉरेन्सिकचे पथकदेखील पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना तीन गोळ्यांची आवरणे आढळली. या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत आरोपींचा शोध सुरू होता.

बराच वेळापासून पाठलागाची शक्यता
संबंधित आरोपी दिपानी यांचा बराच वेळापासून पाठलाग करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांनी दिपानी मुख्य रस्त्यापासून आत शिरल्यानंतर त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार व्यापारातील वर्चस्वातून झाला आहे का तसेच संबंधित रक्कम हवालाशी निगडीत होती का या दिशेनेदेखील शोध सुरू आहे. दिपानी यांनी अगोदर बॅगेत दोन लाख असल्याचे सांगितले. मग आकडा पाच लाखांवर गेला. त्यानंतर ५० लाखांची बाब समोर आली. त्यांनी नेमके किती पैसे होते हे सांगण्यात लपवाछपवी केल्याने तो पैसे हवालाशी निगडीत असल्याचा पोलिसांचा संशय आणखी बळावला.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू
या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तातडीने संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. या भागातील निवासस्थानांमधील सीसीटीव्हीचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे. दिपानी यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!