अकोला दिव्य न्यूज : दक्षिण मध्य रेल्वेच्या अनुषंगाने अकोला आणि अकोट रेल्वे प्लॅटफॉर्मवरील समस्या, मुलभूत सुविधांचा अभाव यासोबतच अनेक मार्गावर नवीन गाड्या सुरू करणे, त्यासाठी पिट लाईनचे काम प्रस्तावित करणे, काही गाड्यांच्या फेऱ्या वाढविणे, या आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून प्रवासी व व्यावसायिकांचा प्रवास सुकर होईल आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर अँड. एस.एस.ठाकूर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा घडवून आणली. विभागीय व्यवस्थापकांनी प्रत्येक मुद्दावर सविस्तर माहिती देऊन, अनेक मुद्दे लवकरच मार्गी लागतील.तर अन्य कामांसाठी कार्यवाही प्रस्तावित करण्याची ग्वाही दिली. इतर कामात येणाऱ्या अडचणी सभेत सांगितल्या.

साऊथ सेंट्रल रेल्वे विभागाच्या नांदेड विभागीय कार्यालयात शुक्रवार १२ सप्टेंबरला झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत अँड. ठाकूर यांनी सविस्तर पत्र देऊन चर्चा केली. पत्रात नमूद मुद्द्यानुसार अकोला स्थानकावरून रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी पिट लाईन साठी आवश्यक तांत्रिक बाबींची पुर्तता, यासोबतच अकोला-शिवनी शिवापूर स्टेशनवर गुड्स शेडचे काम सुरू असताना शिवणी स्टेशनवर कंटेनर सुविधेच्या आवश्यकतेचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवून पाठपुरावा करणे.

उन्हाळी व पावसाळी हंगाम लक्षात घेता प्लॅटफॉर्म क्रमांक ४, ५ व ६ च्या संपूर्ण प्लॅटफॉर्मला कव्हर करण्यासाठी प्लॅन हेड-५३०० अंतर्गत एक नवीन काम प्रस्तावित करणे.
दक्षिण मध्य रेल्वेचे अकोला रेल्वे स्थानकावरील ४, ५ व ६ या प्लॅटफॉर्मवरील साफसफाई तसेच अकोला ते तिरुपती आणि इतर सुटणा-या गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारा निर्देशक आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या आगमन आणि निर्गमनाचे निर्देशक आवश्यक आहेत. यावर प्रवाशांना या सुविधा पुरविल्या जाणार.असे यावेळी सांगितले.
अकोट स्थानकावर भारतातील सर्व रेल्वे स्थानकांना तिकिटे देण्याची सुविधा नाही, त्यामुळे हैदराबाद, नांदेड, जयपूर, दिल्ली, नागपूर, मुंबई येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे.अकोट रेल्वे स्थानकाच्या मागील उत्पन्नाच्या नोंदी लक्षात घेता, सर्वस्थानकांसाठी तिकीट आणि आरक्षण खिडकी असणे आवश्यक आहे. यासोबतच अकोट स्थानकावर आर.पी.एफ. आणि जी.आर.एफ. नसल्यामुळे, असामाजिक घटकांनी गैरसोय करून स्थानकाच्या संपूर्ण परिसरात कब्जा केला आहे, त्यामुळे प्रवाशांना सुविधांचा वापर करता येत नाही, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती तरतूद करावी आणि तिकिटे नसलेल्या व्यक्तींची संख्या वाढल्याने उत्पन्न कमी होऊ शकते, म्हणून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे अँड. ठाकूर यांनी सांगितले.

पूर्णा बायपासचा प्रलंबित प्रकल्पाला लवकरात लवकर सुरू करणे, अकोला मार्गे नांदेड कुर्ला ही रेल्वे गाडी TOD म्हणून धावत होती. मात्र प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याने ती बंद करण्यात आली आहे. नांदेड ते संभलपूर ही गाडी एका दिवसासाठी हिंगोली, अकोला आणि नागपूर मार्गे वळवता येईल. यामुळे ७ तासांचा वेळ वाचेल आणि ३०० किमी अंतर कमी होईल. त्यामुळे ती अधिक सोयीस्कर आणि खर्च वाचवता येईल.असा मुद्दा अँड ठाकूर यांनी उपस्थित केला.
०७०५३/०७०५४ काचीगुडा बिकानेर या स्पेशल गाडीच्या वाहतुकीचा विचार करता, तिची वारंवारता दररोज नियमितपणे वाढवता येईल. मात्र काचीगुडा बिकानेर काचीगुडा टीओडी स्पेशलची वारंवारता वाढवणे हे हैदराबाद विभागाशी संबंधित असल्याने त्यासाठी उच्च पातळीवरून पाठपुरावा करावा.
नागपूर ते संभाजी नगर अशी इंटरसिटी एक्सप्रेस. या मार्गावर दररोज किमान तीन वेळा वाहतूक करून साप्ताहिक गाड्यांची वारंवारता वाढवता येईल. बसमत हिंगोली, वाशिम येथील लोकांना फायदा होईल म्हणजेच नांदेड-गंगानगर, काचीगुडा अकोला इंटरसिटी, नांदेड-गंगानगर, हैदराबाद-अजमेर गाड्यांच्या वारंवारता वाढवण्यासाठी मुख्यालयाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळवून घ्यावी.

अकोला पूर्णा, अकोला-परळी, सिकंदराबाद-जयपूर, हैदराबाद अजमेर या मार्गाकडे लक्ष द्यावे, असं अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे पत्रात नमूद केले होते. त्यावर चर्चा केली असता, अकोला ते नांदेड दरम्यान २ दैनिक एक्सप्रेस, १४ नॉन-डेली एक्सप्रेस गाड्या जोडणी प्रदान करतात. आयआरटीटीसी २०२४-२५ मध्ये प्रस्ताव आधीच प्रस्तावित केला गेला आहे. यासोबतच इतर बाबींवर लक्ष केंद्रित करून त्या तातडीने मार्गी लावण्यात येणार असे दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी सांगितले.