अकोला दिव्य न्यूज : इस्रायलने मागील ७२ तासांत ६ इस्लामिक देशांवर हल्ला केला आहे. ज्यात गाजासह सीरिया, लेबनान, कतार, यमन आणि ट्यूनिशियाचा समावेश आहे. या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त लोक मारले गेले तर १ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवार ते बुधवार या काळात हे हल्ले केले. या देशांमधील दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आल्याचे इस्रायलने दावा केला. मात्र अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारची राजधानी दोहामध्ये हमास अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केले. त्यांनी या हल्ल्याची तुलना ९/११ हल्ल्यानंतर अमेरिकेने केलेल्या कारवाईशी केली आहे. आम्ही तेच केले, जे अमेरिकेने त्या काळी केले होते असं इस्रायलने सांगितले. इस्रायलच्या सैन्याने मंगळवारी राजधानी दोहावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात हमास प्रमुख खलील अल हय्या याला टार्गेट करण्यात आले. त्यात अल हय्याचा मुलगा, ऑफिस डायरेक्टर, ३ गार्ड, एक सुरक्षा अधिकारी यांच्यासह ६ लोक मारले गेले.
हल्ला अशावेळी झाला जेव्हा हमासचे नेते अमेरिकेसोबत युद्धविराम प्रस्तावावर चर्चा करत होते. मात्र आता इस्रायलच्या हल्ल्यानंतर हमासने युद्धविराम करण्यास नकार दिला आहे. सोमवारी इस्रायलने पूर्व लेबनान येथील बेका, हरमेल जिल्ह्यात हवाई हल्ले केले. ज्यात ५ लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सैन्य ठिकाणांना टार्गेट करण्यात आले असं इस्रायलने सांगितले. नोव्हेंबर २०२४ मध्ये इस्त्रायल आणि लेबनान यांच्यात युद्धविराम झाला होता. त्यानंतरही इस्रायल लेबनानच्या दक्षिणेकडे हल्ले करत राहिला.
त्याशिवाय इस्रायलने सोमवारी सीरियाच्या एअरफोर्स बेस आणि सैन्य तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी नाही असं सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सने सांगितले. सीरिया आणि इस्रायल यांच्यात १९७४ साली झालेल्या करारानुसार एकमेकांवर हल्ले न करण्यावर सहमती झाली होती. परंतु मागील डिसेंबर महिन्यात सीरियाचे माजी राष्ट्रपती बशर अल असद यांचे सरकार कोसळल्यानंतर इस्रायल सैन्याकडून सातत्याने सीरियाच्या सैन्य ठिकाणांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात येत आहेत.
यावर्षी इस्रायलने सीरियावर ८६ हवाई आणि ११ जमिनी हल्ले केले आहेत. त्यात ६१ लोक मारले गेले. एकूण १३१ ठिकाणांना टार्गेट करण्यात आले होते.दरम्यान, सोमवारी रात्री इस्रायली ड्रोनने ट्यूनिशियाच्या पोर्टवर फॅमिली बोटवर हल्ला करण्यात आला. त्यात ६ प्रवासी होते. या हल्ल्यात सुदैवाने कुणाचा जीव गेला नाही. मंगळवारी ब्रिटनचा झेंडा लावलेल्या जहाजावरही इस्रायली ड्रोनने हल्ले झाले. यमनची राधानी सनावर गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. त्यात हुती ठिकाणांना टार्गेट केले. याआधी २८ ऑगस्टला इस्त्रायलने सनावर हवाई हल्ले केले होते. ज्यात हुती पंतप्रधान अहमद अल रहावीसह १० लोक मारले गेले. ९० हून अधिक जखमी झाल होते. गाजामध्येही इस्रायलने सोमवारी हल्ला केला. त्यात १५० लोक मारले गेले. ५४० हून अधिक जखमी झालेत. गाजाचा जवळपास ७५ टक्के भागावर इस्त्रायलने कब्जा केला आहे.