अकोला दिव्य न्यूज :अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे धर्मांतराचा घाट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशिष्ट धर्माचे लोक आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

चान्नी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथील एका दिव्यांग शेतमजुराला आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर करण्यासाठी आग्रह धरला जात होता. सोबतच एका विशिष्ट धर्माची प्रार्थना केल्याने दिव्यांगत्व दूर होऊन पाय बरा होईल, असे देखील सांगण्यात आले होते.
त्यासाठी ४० ते ५० जण इतर गावातून आले होते. या प्रकाराची माहिती मिळताच गावात गर्दी वाढली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण होऊन वादविवाद सुरू झाला. ग्रामस्थांनी बाहेर गावाच्या लोकांना प्रश्न विचारण्यासाठी गर्दी केली. यावेळी दोन्ही गटांत शाब्दिक चकमक उडाली.
घटनेची माहिती चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांना देण्यात आली. गावात जमाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला. बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी सर्व बाहेरगावच्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशीसाठी चान्नी पोलीस ठाण्यात आणले होते.
या प्रकरणात देवानंद चवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ३५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणी चान्नी पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.”