• लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये करणार मास्टर्स •
अकोला दिव्य न्यूज : ब्रिटिश गव्हर्मेंट फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट कडून दिल्या जाणाऱ्या चिवनिंग स्कॉलरशिपसाठी अकोल्यातील युवक प्रबोध दत्तात्रय महाजन यांची निवड करण्यात आली आहे.तसेच अदानी समूहतर्फे Artificial Intelligence क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशातील अव्वल ५ लिडर्समध्ये प्रबोध महाजन यांची निवड झाली आहे.

या प्रतिष्ठित स्कॉलरशिपअंतर्गत प्रबोध महाजन इंग्लंडमधील जागतिक स्तरावर पहिल्या दहामध्ये गणल्या जाणाऱ्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) येथे मास्टर ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पॉलिसी) हे पदव्युत्तर शिक्षण घेणार आहेत.
या वर्षी एकूण १४० पेक्षा जास्त देशांमधून तब्बल १ लाख ५ हजार अर्ज ब्रिटिश गवर्नमेंटकडे प्राप्त झाले होते. त्यामधून केवळ १% विद्यार्थी, म्हणजेच सुमारे १००० विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. भारतातून निवड झालेल्या ५४ प्रतिभावान तरुणांमध्ये अकोल्याचा प्रबोध महाजन हे एक आहेत, ही अकोल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. अदानी समूह दरवर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन किंवा नेतृत्व करणाऱ्या फक्त ५ जणांची निवड करतो. प्रबोध महाजन हे त्यात स्थान पटकावणारे तरुण आहेत.
या यशाबद्दल निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने प्रबोध महाजन यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या सत्कार प्रसंगी मंडळातर्फे पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रबोध यांना भविष्यात आपल्या शिक्षणाचा आणि जागतिक अनुभवाचा फायदा अकोल्यातील तरुणाईला व अकोला शहराला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रबोध यांच्या या कामगिरीमुळे अकोला शहराचा गौरव संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे.