Influencer Misha Agrawal Suicide Case : अकोला दिव्य न्यूज : कंटेंट क्रिएटर मीशा अग्रवाल हिने तिच्या २५ व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबद्दल तिच्या कुटुंबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. यानुसार २४ एप्रिल रोजी मीशाने स्वतःचे जीवन संपवले. दरम्यान यामुळे सोशल मीडियावर मीशाला फॉलो करणार्यांना आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

२६ एप्रिल रोजी मीशाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये ‘मीशा अग्रवाल, २६ एप्रिल २००० ते २४ एप्रिल २०२५’ इतकेच पोस्ट करण्यात आले होते. या पोस्टमध्ये मीशाच्या मृत्यूचे कारण सांगण्यात आले नव्हते. दरम्यान यामुळे अनेकांना धक्का बसला तसेच अनेकजण संभ्रमात देखील होते. यानंतर मीशाच्या बहिणीने ३० एप्रिल रोजी मीशाने आत्महत्या केल्याची माहिती दिली.

मीशाच्या फोनच्या वॉलपेपरचा फोटो पोस्ट करत तीने एक भावनिक नोट शेअर केली, ज्यामध्ये ती म्हणाली की, “तिच्या फोनचे वॉलपेपर सर्वकाही सांगून जाते. तिचे आयुष्यातील एकमेव ध्येय. इंस्टाग्राम काही खरं जग नाही आणि फॉलोअर्स हे काही खरं प्रेम नाही, कृपया हे समजून घ्या. मीशाने फोनमध्ये वॉलपेपर म्हणून लावलेल्या फोटोमध्ये इंस्टाग्राम फॉलोअर्सबाबत तिचं ध्येय दाखवणारा फोटो ठेवलेला होता.

फॉलोअर्स कमी होण्याची भीती..
दरम्यान भावनिक पोस्टमध्ये बहिणीने मीशाच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती दिली आहे. सोशल मीडियावरील फॉलोअर्समुळे मीशाचे मानसिक आरोग्य कसे बिघडत गेले यावर देखील तिने भाष्य केले आहे. माझ्या लहान बहिणीने इंस्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्सभोवती तिचे जग निर्माण केले होते, ज्याचे एकमेव ध्येय १ मिलीयन फॉलोअर्सपर्यंत पोहोचणे आणि चाहत्यांकडून प्रेम मिळवणे होते. जेव्हा तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले तेव्हा ती अस्वस्थ झाली आणि तिला स्वत: निरूपयोगी असल्याचे वाटू लागले.

एप्रिलपासून ती खूप नैराश्यात होती, ती अनेकदा मला मिठी मारून रडायची आणि म्हणत असे, ‘जिज्जा, माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन? माझं करिअर संपेल, असे तिने म्हटले आहे.

मीशाकडे कायद्याची पदवी होती आणि ती प्रोव्हिनशियल सिव्हील सर्व्हिसेस ज्युडिशीयल (पीसीएसजे) परीक्षेची तयारी करत होती. पण तीला ऑनलाईन प्रसिद्धी आणि मानसिक आरोग्य यांच्यात समतोल साधताना अडचणी येत होत्या. तिच्या बहिणीने दोघींमध्ये झालेल्या संभाषणांबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये मीशा तिची इंस्टाग्राम एंगेजमेंट कमी होईल आणि तिचे करिअर कोसळेल याबद्दल कायम चिंतेत असायची.

अन् कुटुंब उद्ध्वस्त झालं…
तिच्या बहिणीने तिला यामधून बाहेर काढण्याचा तसेच धीर देण्याचा प्रयत्न केला. तिने आजपर्यंत मिळवलेल्या गोष्टी दाखवून देण्याचा तसेच भविष्यात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र मीशा ही डिजिटल जगामध्येच अडकून पडली. “मी तिला सल्ला दिला की इंस्टाग्रामला फक्त मनोरंजन म्हणून पाहा आणि त्यामध्ये स्वतःला समावून जावू देऊ नको.

मी तिला तिच्या आनंदावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि चिंता आणि नैराश्य सोडून देण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, माझ्या लहान बहिणीने ऐकले नाही आणि ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्समध्ये इतकी अडकून पडली की ती कायमची आपलं जग सोडून गेली. दुर्दैवाने ती इतकी हतबल झाली की तिने स्वत:चा जीव घेतला आणि आमचे कुटुंब उद्ध्वस्त झालं, असं तिच्या बहिणीने नोटमध्ये लिहिले आहे.
