अकोला दिव्य न्यूज : काश्मीर पर्यटनासाठी पर्यटकांना घेऊन, सुखरूपपणे विक्रमी 303 सहली पुर्ण करुन पर्यटन व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अकोला येथील डॉ. माधव देशमुख यांना कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बांधकाम, आरोग्य, पर्यटन, पर्यावरण, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुष यांचा नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे यथोचित सन्मान करण्यात येतो.

यंदाही १ मे २०२५ रोजी महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा हा सोहळा नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक मधिल विशाखा हॉल मध्ये संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, वकीलनामा युट्यूब चॅनेलचे अद्वैत चव्हाण, अभिनेता पवन मोरे, मिसेस युनिव्हर्सल ज्योती केदार शिंदे, 18 लोकमत न्यूज चॅनेल मुंबईचे संपादक मंदार फणसे, धुळे मतदार संघाच्या खासदार शोभाताई बच्छाव उपस्थित होते.
सर्व प्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.
भारतातील पर्यटनस्थळी विपरीत परिस्थितीमुळे गोंधळलेल्या पर्यटकांना धीर देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे.पर्यटकांना योग्य ठिकाणी ने-आण करणे अश्या पद्धतीचे कार्य करणारे डॉ. माधव देशमुख यांच्या या कार्याची नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने दखल घेऊन त्यांना कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित केले.
मंचावर उपस्थितांचे मार्गदर्शनपर भाषणे झालीत. या नंतर सत्कार सोहळा संपन्न झाला.सोहळ्याला नाशिक येथील गणमान्य नागरिक उपस्थित होते.डॉ माधव देशमुख यांचे या सन्मानासाठी विविध क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले.