अकोला दिव्य न्यूज : प्रत्येकजण आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करतो. सामाजिक ऋण फेडण्यासाठी परंपरागत चालत आलेल्या कार्यात सहभागी होतो.परंतु काही वल्ली वेगळ्या वाटेने जाऊन नेमके तेच करतात, जे त्यावेळेस समाजबांधव वा संबंधित कुटुंबाला आवश्यक आहे. एका वेळेस कोणाच्या सुखात सहभागी होऊ नका पण दुःखद प्रसंगात आपणहून जाऊन समोरच्याच दुःख हलके करावे, अशा एक अलिखित नियमच आहे. नेमकं हेच लक्षात घेऊन, समाजातील कुठल्याही कुटुंबात निधन झाले की मृतकाच्या ‘अंत्यविधी’ मध्ये ‘तन-मन-धन’ या सूत्राने प्रत्यक्ष कृतीतून यथोचित सहकार्य करण्याचे काम करणाऱ्या ध्येयवेड्या अंत्ययात्रा ‘परमार्थी’ चा आज जन्मदिवस !

माहेश्वरी समाजातील कुठल्याही कुटुंबात निधन झाले की, काही वेळातच दत्ता सारखं ‘रमण’ हजर ! तातडीने त्या निधनाची समाजबांधवांना माहिती दिली की, मृताच्या कुटुंबाला प्रोत्साहन देऊन नेत्रदान करून घेतले की त्या कुटुंबातील परंपरेने अंतिम संस्कारांची तयारी करुन त्या अनुसार अंत्येष्टी पार पाडणे, एका अर्थाने हे कार्य स्पष्टपणे परमार्थी असून सामाजात निरपेक्षपणे सेवा देणारा हा ध्येवेडा म्हणजे स्वयंसेवी प्रा.डॉ रमण हेडा होय.
त्यांच्या या अद्वितीय कार्याबद्दल एका सोहळ्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांच्या हस्ते प्रा. हेडा यांचा गौरव करण्यात आला.सामाजिक परंपरा व प्रथेप्रमाणे अंतिम संस्कार प्रक्रियेमध्ये कार्य करीत, शेवटी मृतकाचे मृत्यु प्रमाणपत्र देखील कुटुंबाला आणून देण्याचे कार्य करतात. हेडा यांनी पदरमोड करून केलेल्या खर्चा बद्दल मृतकाचे कुटुंबिय विचारणा करतात तेव्हा, मी समाजऋण फेडत आहे.असं सांगून हेडा मोकळे होतात. मात्र कितीही आग्रह केला तरी आजवर कोणाकडून एक रूपया घेतला नाही.

विदर्भ प्रदेश संगठनचे मावळते प्रदेश सचिव हेडा यांनी आपल्या सेवा कार्याने समाज सेवकांना योग्य जाणीव करून देत नवीन दिशा दिली.समाजातील समस्यांच्या निराकरणासाठी देवदूतासारखं पाठीशी उभे राहून आपले कर्तव्य करीत आहेत. समाजात सातत्याने पुढाकार घेऊन समरसतेला प्रोत्साहन देणारे हेडा यांनी इंजिनियरींग, वाणिज्य, कला, पत्रकारिता, व्यवस्थापन, विधी, सामाजिक कार्य, मानव संसाधन विकास अशा विविध क्षेत्राचा अभ्यास करत उच्च पदवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर आचार्य पदवी सुद्धा प्राप्त केली आहे.

यंदा सुवर्ण जयंती महोत्सवाची वर्षातील माहेश्वरी प्रगति मंडळाचे माजी अध्यक्ष रमण हेडा सध्या अकोला-वाशिम या संयुक्त जिल्ह्याचे युवा संगठनचे संस्थापक जिल्हा अध्यक्ष आहेत. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी युवा संगठनेच्या प्रदेश अध्यक्ष पदावर सेवा देत युवकांना संगठित करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.अकोला जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हा सचिव ते विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संगठनेच्या सचिव पदावर कार्य करीत प्रा हेडा यांनी विदर्भातील माहेश्वरी समाजामधील १०० स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारापर्यंत पोहचून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर अध्यक्ष ते भाजपा शहर सचिव पदापर्यंत कार्य करणारे रमण हेडा यांचा केंद्र शासनाने जलमित्र म्हणून गौरव केला आहे. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संगठनचे सारथी अभियान संयोजक रमण हेडा अकोला माहेश्वरी समाज ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून पहिल्यांदाच आपले कर्तव्य पार पाडत असून ध्येयवेड्या ‘परमार्थी’नी अंत्ययात्रा सेवेचं केलेलें बीजारोपण भविष्यात निश्चितच वटवृक्ष होईल……