अकोला दिव्य न्यूज : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे विलक्षण कोंडी झालेल्या व भेदरलेल्या पाकिस्तानने अखेर शनिवारी नांगी टाकली व शस्त्रसंधी करण्यासाठी बाबा पुरता केला. दोन्ही बाजूंनी घोषणाही झाली. मात्र, घोषणेच्या तीन तासांनंतरच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. यात ७ नागरिकांचा मृत्यू झाला. तर सीमा सुरक्षा दलाचे आठ जवानही जखमी झाले आहेत. विचारांती भारताने होकार दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली होती.

भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केले. अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांत झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. मध्यस्थी करत असलेल्या चर्चेनंतर ही सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले. पण रात्रीचे चित्र पुन्हा युद्धासारखेच होते.
पाकच्या कुरापतींमुळे कुठे-कुठे ब्लॅक आऊट? शस्त्र संधीच्या उल्लंघनामुळे जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या अनेक जिल्ह्यांत ब्लॅक आऊट करण्यात आला. ती ठिकाणे अशी श्रीनगर, उधमपूर, अखनूर, नौशेरा, पुंछ, राजौरी, मॅधार, जम्मू, सुंदरबनी, आरएस पुरा, अनिया, कठुआ, रियासी, कटरा (जम्मू-काश्मीर) फिरोजपूर (पंजाब) आणि बाडमेर (राजस्थान).
दोन्ही देशांत काय आणि कसे घडले ? मिसी म्हणाले की, पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओंशी शनिवारी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी संपर्क साधला. त्यानंतर झालेल्या चर्चेतून संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी नागू करण्याचा निर्णय घेतला. सीमेवर दोन्ही बाजूनी होणारा गोळीबार, क्षेपणास्त्र, ड्रोन यासारखे हवाई हल्ले थांबविण्यात आले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, पाकचे परराष्ट्रमंत्री इशाक दार आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी बोलणी केली. रुबिओ यांनी म्हटले आहे की, गेल्या ४८ तासांत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी आणि मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर आदी लोकांशी चर्चा केली. त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

आता पुढे काय? उद्या सोमवारी चर्चा होणार का?
भारताने १४ मेपर्यंत बंद ठेवलेले ३२ विमानतळ उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दोन्ही देशांचे लष्करी संचालन महासंचालक (डीजीएमओ) १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा संवाद साधतील. यावेळी पुढील पावले काय उचलायची यावर चर्चा होईल.