अकोला दिव्य न्यूज : छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त अकोला नगरीत मिरवणुकीचे आयोजन छावा संघटनेतर्फे करण्यात आले आहे. स्थानिक शिवाजी पार्क येथून १४ मे रोजी दुपारी 4 वाजता निघणाऱ्या मिरवणुकीत हजारो युवकांसह विविध आखाडे व देखाव्यांचा समावेश राहणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांनी दिली आहे.मागील अनेक वर्षांपासून छावा संघटनेतर्फे संभाजी राजे जयंती निमित्त ही मिरवणूक काढण्यात येत असते. यावर्षी सुद्धा ही मिरवणूक भव्य प्रमाणात काढण्यात येणार आहे.

यावर्षीच्या मिरवणुकीत पातुर येथील नामांकित वाघ, अकोट नजीकच्या जंगलातील अस्वलाची प्रात्यक्षिके, पोटात तलवार खुपसून घेणारा भिल्ल, महाकाली हनुमान, महाकाल, मेळघाट मधील आदिवासींचे नृत्य, महिलांचे वारकरी मंडळ, विविध भजनी मंडळे, पिंपरी, आळंदा, देगाव, मानकी, तेल्हारा, सामदा दर्यापूर येथील आखाड्यांची थरारक प्रात्यक्षिके, अश्वारूढ झालेली विविध ऐतिहासिक व थोर पात्र, आदींचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. अकोला वासियांनी कधीही न बघितलेले प्रात्यक्षिके तसेच लहान मुलांसाठी व महिलांसाठी विविध आकर्षक असे देखावे या मिरवणुकीत प्रामुख्याने सहभागी होत आहेत.

स्थानिक शिवाजी पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दुपारी 4 वाजता या मिरवणुकीचा प्रारंभ होईल. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील युवक व नागरिकांनी हजारोच्या संख्येत या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे विनंती वजा आवाहन छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख वाकोडे व छावाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे