अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील ख्यातनाम चार सराफा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठान आणि घरांवर बुधवार १४ मे २०२५ रोजी आयकर विभागाने एकाचवेळी छापे टाकून सुरू केलेली तपासणी आणि चौकशी आज शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दोन सराफा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठान व घराच्या तपासणी दरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर या लोकांची ईडीकडून चौकशी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे माहिती मिळाली नाही.

अकोला येथील एकता ज्वेलर्सच्या अमरावतीसह इतर ठिकाणी असलेल्या दुकानावर त्याचं वेळी छापा टाकून सुरू केलेली तपासणी अद्याप संपलेली नाही. सराफा व्यवसायासोबत प्रॉपर्टी आणि इतर व्यवसायात या व्यावसायीकांचा सहभाग असल्याने बारकाईने चौकशी सुरू असल्याची बाजारपेठेत गुणगुण आहे. अकोला शहरातील जुने तहसील कार्यालय जवळील पूनम ज्वेलर्स, गांधी रोडवरील ईशा ज्वेलर्स व प्रकाश ज्वेलर्स आणि रतनलाल प्लॉट नेकलेस रोडवरील एकता ज्वेलर्स या चारही ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छापा टाकल्यानंतर अकोला शहरासह पश्चिम विदर्भातील सराफा बाजारात मोठी खळबळ माजली असून सलग चौथ्या दिवशीही चौकशी सुरू असल्याने अनेकांचा बीपी वाढला आहे.
सोने आणि चांदीचे भाव सतत वाढत असल्याने चोरट्या मार्गाने देखील सोन्याची आवक वाढली असून, ग्राहकांकडूनही सोने विक्रीचे वाढते प्रमाण आणि तेजीचा फायदा करून घेण्यासाठी होणारा स्टॉक अशा एकुणच उलाढालीच्या पार्श्वभूमीवर छापेमारी असल्याचे दिसून येत आहे. मात्र जमीन खरेदी विक्रीचेही या छापेमारीला कंगोरे असल्याची चर्चा आहे.