Saturday, July 5, 2025
HomeUncategorized२० लाख जागा ! 21 मेपासून 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज...

२० लाख जागा ! 21 मेपासून 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज ; पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

अकोला दिव्य न्यूज : राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील ९ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, विद्यार्थ्यांना बुधवार २१ मे पासून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी ३ जूनला जाहीर झाल्यावर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

गेल्या वर्षीपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या पाच विभागांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित राज्यभरात महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येत होती. मात्र, शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून संपूर्ण राज्यभरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ‘https://mahafyjcadmissions.in/’ या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करून त्यावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
तर, विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मेपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात, पहिली फेरी दोन दिवस विलंबाने सुरू होत असल्याचे दिसून येत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अकरावीच्या प्रवेशाची पहिली फेरी २१ मेपासून सुरू होणार आहे. त्यात २१ ते २८ मे कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयांचे किमान एक ते कमाल दहा प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्तायादी ३० मे रोजी जाहीर केली जाणार आहे. या यादीवर १ जूनपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत. ३ जून रोजी अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्तायादी जाहीर होऊन ६ ते १२ जून या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरावासाठी दोन दिवस
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानुसार १९ आणि २० मे रोजी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, प्राधान्यक्रम नोंदवण्याचा सराव करू शकणार आहेत. सरावासाठी भरलेली माहिती २० मे रोजी मध्यरात्री संकेतस्थळावरून हटवण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना २१ मे रोजी नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.

राखीव कोट्यातील प्रवेश ३ जूनपासून
पहिल्या फेरीसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना अंतर्गत व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यातील राखीव जागांसाठीही अर्ज करता येणार आहे. या राखीव जागांवरील प्रवेश ५ जूनपासून देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

२० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध
राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात विज्ञान शाखेच्या ८ लाख ५२ हजार २०६, वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ जागा आहेत. सर्वाधिक ४ लाख ६१ हजार ६४० जागा मुंबई विभागात, त्या खालोखाल ३ लाख ७५ हजार ४८६ जागा पुणे विभागात, २ लाख ६६ हजार ७५० जागा छत्रपती संभाजीनगर विभागात असल्याची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!