अकोला दिव्य न्यूज : उन्हाळी सुट्ट्यांचा वेळ सार्थकी लावण्यास अकोला नगरीत 22 ते 31 मे 2025 या कालावधीत निःशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्षे 14 च्या वरील वयोगटातील विद्यार्थ्यांना या शिबिरात भाग घेता येईल. आर. डी. जी. इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म टेलिव्हिजन अँड ड्रामा टिक तसेच सिद्धी गणेश प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार निर्माण व्हावेत व त्यांना योग्य मार्गदर्शनासह व्यासपीठ मिळावे या हेतूने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सेवा सदनाचे संचालक दिलीपराज गोयनका यांच्या संकल्पनेतून आर. डी. जी. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चारुशीला रुमाले यांच्या मार्गदर्शनात सिद्धी गणेश प्रोडक्शनचे संचालक सचिन गिरी यांच्या नियोजनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे नाट्य व सिने सृष्टीतील अनेक दिग्गज या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत हे विशेष.
सदर शिबिराचे उद्घाटन 22 मे रोजी सकाळी दहा वाजता आर. डी. जी. महिला महाविद्यालयात करण्यात येईल. याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्हा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष तथा अ.भा.लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे व जेष्ठ नाट्यकर्मी तसेच रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाचे सदस्य रमेश थोरात उपस्थित राहतील.
या नाट्य प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून नाट्य क्षेत्रातील व नाट्य प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले देवदत्त पाठक आणि त्यांचे सहकारी मिलिंद केळकरसह सी.आय.डी. क्राइम पेट्रोल, कुछ ना कहो आदी प्रख्यात टीव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या किरण ठाकरे पावसकर या प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे भारतभर प्रख्यात नाट्य प्रशिक्षक व सिने दिग्दर्शक हरीश इथापे तसेच आदिपुरुष, औरो में दम कहा था, मोगरा फुलला, काली व्हिडिओ पार्लर, स्पेशल फाईव्ह आधी चित्रपट व वेब सिरीज मध्ये काम करणारे सौरभ ठाकरे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहून शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रवेश शुल्क नसलेल्या या शिबिरात प्रवेशासाठी महाविद्यालयात सचिन गिरी यांच्याशी संपर्क साधावा तसेच या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिन गिरी, गीता जोशी, विष्णू क्षीरसागर, अश्विनी ठाकरे, मोनिका अनासने, महेश इंगळे, रोशन समदुरे, प्रमोद वानखडे, स्वराज पाटोळे, अक्षय पिंपळकर, साहिल सप्रे यांनी केले आहे.