अकोला दिव्य न्यूज : अकोला रेल्वे स्थानकासमोरील परिसरात काल रात्रीला तरुणांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून शाब्दिक चकमक उडाली आणि बघता बघता दोन गट आमनेसामने येऊन धारदार चाकूने हल्ला करण्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेत तीन युवक गंभीरपणे जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात रविवारी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे स्थानकासमोर एका बिअर बारमधून बाहेर पडणाऱ्या तरुणांसोबत दुसऱ्या गटातील युवकांची बोलाचाली होऊन, त्यांच्यात रक्तरंजित संघर्ष होऊन तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. जेव्हा रेल्वे स्टेशन चौकातील एका बारमधून बाहेर पडणाऱ्या काही तरुणांचा पैशाच्या व्यवहारावरून इतर तरुणांशी वाद झाला. काही वेळातच दोन्ही गटात तुफान हाणामारी सुरू झाली, आणि ती चाकू हल्ल्यात रूपांतरित झाली. दोन्ही बाजूंनी धारदार शस्त्रांनी हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यात एकूण तीन तरुण जखमी झाले, ज्यांना तात्काळ अकोलाच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये आदित्य भरत मानवतकर (वय २५, रा. भीम चौक, अकोट फैल) यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटातील जखमींची ओळख पटली असून २९ वर्षीय नवीद अन्वर अब्दुल करीम आणि २७ वर्षीय तारिक अझीझ अब्दुल करीम अशी नावे आहेत. ते बैदपुरा येथील लाल बांगला परिसर येथील रहिवासी आहेत. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशन चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला असून घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.