अकोला दिव्य न्यूज : काश्मीरचे बैसरन खोरे सुनसान झाले आहे…. आजपासून एक महिन्यापुर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी याच बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना ठार मारले होते. पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड कृत्याचा वचपा काढण्यासाठी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाांना उध्दवस्त केले. मात्र पर्यटकांना ठार मारणारे दहशतवादी आजही जीवंत आहेत. भारतातील या ‘मिनी स्वित्झर्लंड’ मध्ये एकही पर्यटक दिसत नाहीये. रस्त्यांवर शांतता आहे आणि स्थानिक दुकानदार पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना शिव्या देत आहेत. कारण त्यांनी स्थानिकांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना ठार मारले. तेव्हापासून संपूर्ण पहलगाममध्ये शोकाकुल वातावरण आहे. पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून येथील ८० हजार लोक महिन्यापासून बेरोजगार आहेत.

हल्ल्यापूर्वी दरमहा २ लाख पर्यटक येत होते. आता १० हजारही येत नाहीत. ६-७ हजार रुपयांची हॉटेलची खोली १ हजार किंवा त्याहून कमी किमतीत मिळेल. एका हॉटेलचे मालक मोहंमद शफी यांना पहलगामची दुर्दशा सांगताना रडू कोसळले. ते म्हणाले – हॉटेलमध्ये २ कर्मचारी उरले आहेत. सर्व ४० खोल्या रिकाम्या आहेत.
सीमेपलीकडून पाकिस्तानच्या अमानुष गोळीबाराने जम्मू-काश्मीरमधील हजारो निष्पाप कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की, पाकिस्तानच्या गोळीबारात आठ हजारपेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले. यापैकी ६ हजार एकट्या पूंछमध्ये आहेत. राजौरी, कर्नाह आणि उरीमध्येही शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. पूंछचे आमदार अजाज जान म्हणाले, माझ्या मतदारसंघात एकही गाव असे नाही जे हल्ल्यातून वाचले असेल. पूंछमधील मंकोट, मेंढर, कृष्णा घाटी, शाहपूर, गाम्बीर यांसारख्या गावांमध्ये घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शाळा, मशिदी, बाजारांपर्यंत सर्वांनाच पाकिस्तानने लक्ष्य केले आहे.” उरीमध्ये ४६० घरे आणि ७ शाळा कोसळल्या जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी राजौरीचा दौरा केला. पीडितांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
सीमेवर बंकर: १२० गावांमध्ये बनणार, रेशनही : जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये आता इस्रायलसारख्या अत्याधुनिक इशारा प्रणाली बसवल्या जातील. त्यामुळे गोळीबार, क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ल्यांपूर्वीच लोकांना सावध केले जाईल. सायरन ऐकताच लोकांना स्मार्ट बंकरमध्ये पाठवले जाईल. यात १० दिवसांचे खाद्यपदार्थ आणि पाणीदेखील असेल. गृह मंत्रालयाने हा महाप्रकल्प राजौरी, पूंछ, कठुआ, सांबा, बारामुल्ला, कुपवाडा येथील १२० गावांमध्ये सुरू केला आहे. २०२६ पर्यंत हे बंकर, एआय आधारित सिस्टिम तयार होतील. हल्ला झाल्याचे कळताच काही सेकंदात गावांमध्ये सायरन वाजवून इशारा देईल, मोबाइल आणि रेडिओद्वारे अलर्ट जारी करेल. प्रथमोपचार व आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचे प्रशिक्षण देखील देतील. मंत्रालयाने इस्रायल आणि दक्षिण कोरियाच्या प्रणालींचा अभ्यास करून ही योजना तयार केली. सीमेवरील सुमारे १० हजार बंकर अपग्रेड केले जातील.