अकोला दिव्य न्यूज : NEET-PG २०२५ च्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. नीटी-पीजी २०२५ ची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन्सला दिलेत. २ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या NBE चा निर्णय कोर्टाने फेटाळत हा मनमानी व विद्यार्थ्यांवर अन्यायकारक निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने NBE ला निर्देश देत म्हटलंय की, बोर्डाने पारदर्शकपणे परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था करावी. १५ जूनला होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अद्यापही वेळ आहे. दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या सवलतीशी संबंधित मुद्द्यावर परीक्षा संपल्यानंतर विचार केला जाईल असं कोर्टाने सांगितले. जरी परीक्षा मंडळाने अधिक केंद्रे ओळखण्याचा संदर्भ दिला तरी त्याला अधिक वेळ लागू शकतो. ज्यामुळे परीक्षा आयोजित करण्यास विलंब होऊ शकतो आणि सर्व परिणामी केंद्र आणि प्रवेश इत्यादी गोष्टी या न्यायालयाने ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेनुसार होणार नाहीत असा प्रतिवादींच्या वतीने एक युक्तिवाद मांडण्यात आला आहे. हा युक्तिवाद देखील फेटाळण्यात आला आहे.
मागील काही वर्षापासून नीट पीजीसारखी परीक्षा २ वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची कठीण पातळी पूर्णपणे समान मानता येत नाही. ही परिस्थिती असमानता आणि मनमानी निर्माण करते. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे आवश्यक आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. कोर्टाच्या या निर्णयामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व उमेदवार एकाचवेळी एकसारखेच प्रश्नावलीत परीक्षा देऊ शकतात ज्यामुळे ही परीक्षा पद्धत निष्पक्ष आणि पारदर्शक होऊ शकते.