अकोला दिव्य न्यूज : दारू पिण्याकरीता पैसे मागीतल्यावरून झालेल्या वादातून रागाच्या भरात काठी व दगडाने डोक्यावर मारहाण करून यवतमाळ येथील एका इसमाला जिवानीशी ठार मारल्याची घटना अकोला शहरातील कौलखेड चौकात शनिवारी मध्यरात्री घडल्याचे आज रविवारी सकाळी उघडकीस आली.मृतक हा यवतमाळ येथील मूळ रहिवासी असून, गंगाधर डाबेराव (32) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे.

शनिवार 14 जूनच्या मध्यरात्री अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड चौकात ही घटना घडली. प्राप्त माहिती नुसार शनिवारी रात्री 12:30 च्या सुमारास, दोन व्यक्ती नशेत धुंद अवस्थेत लाकडी दंडुका आणि दगडाने एकमेकांवर हल्ला चढवित होते. काही क्षणातच ही हाणामारी इतकी उग्र झाली की, यवतमाळ येथील रहिवासी गंगाधर डाबेराव याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास स्थानिक नागरिकाने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शंकर शेळके व खदान पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज केदारे ताफा सह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.
पोलिस स्टेशन खदान कौलखेड येथील रहिवासी व फिर्यादी उमेश दिनकर मस्के (वय 40) यांनी आज रविवार15 जून रोजी फिर्याद दिली की, 15 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजता नेहमी प्रमाणे आपल्या यश धाबा उघडण्यासाठी गेट समोर गेलो असता, यवतमाळ येथील मुळ रहिवासी व सध्या कौलखेड येथे वास्तव्यास असलेल्या गंगाधर डाबेराव हा मृत अवस्थेत पडलेला दिसला. कोणी तरी अज्ञात इसमाने त्याचा डोक्यावर दगड व काठी मारून त्याचा खुन केल्याचे दिसून आले. फिर्यादीने दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन खदान अकोला येथे खुनाचा गुन्हा दाखल करून तपासावर घेण्यात आला.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत पोलीस अधिक्षक यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला व त्यांच्या पथकास आदेशीत केले. त्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी आरोपीचा शोध घेणे बाबत वेगवेगळे पथक तयार करून तपास कामी रवाना केले.

सदर पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेण्याबाबत तपास केला असता घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार यांच्या कडून मिळालेल्या माहितीवरून कौलखेड येथील नागे लेआऊट येथील रोहीत राजु सोळंके (वय 18) याला ताब्यात घेवुन गुन्ह्यासंबधाने विचारपुस केली असता, त्याने सांगीतले की, मृतकाने रोहीत सोळंके यास दारू पिण्याकरीता पैसे मागीतले. रोहीत याने नकार दिल्याने मृतकाने सोळंके सोबत वाद घालुन शिवीगाळ केली. त्याच रागातुन रोहीत सोळंकेने गंगाधर डाबेरावला काठी व दगडाने डोक्यावर मारहाण करून जिवानीशी ठार मारले असे सांगीतले. यावरून आरोपी रोहीत राजु सोळंके यास पुढील तपास कामी पोलिस स्टेशन खदान यांचे ताब्यात देण्यात आले.