Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedमाजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या बंगल्यात स्फोट ! स्वयंपाक घर खाक

माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या बंगल्यात स्फोट ! स्वयंपाक घर खाक

अकोला दिव्य न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या येथील निवासस्थानी बुधवारी रात्री अचानक स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत शिंगणे यांच्या घरातील स्वयंपाक घरासह त्यातील वस्तू भस्मसात झाल्या आहेत. या घटनेमुळे बुलढाण्यात एकच खळबळ माजली होती. दरम्यान, हा स्फोट फ्रिजच्या कॉम्प्रेसरमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा बुलढाणा येथील चिखली मार्गावर मोठा बंगला आहे. या बंगल्यात बुधवारी रात्री 8 च्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा राजेंद्र शिंगणे व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. घरात केवळ त्यांचे मानसपुत्र पुष्पक शिंगणे, त्यांची पत्नी व इतर काही उपस्थित होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. स्फोटानंतर आग लागल्याने बंगल्याच्या तैनात सुरक्षा रक्षकांनी तत्काळ त्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत स्वयंपाक घर व त्यातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचा अंदाज

ही आग का व कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पण शॉर्ट सर्किट किंवा फ्रिजच्या कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत बंगल्यातील एसी, किचनमधील इलेक्ट्रॉनिक सामग्री आदींचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, हा स्फोट एवढा मोठा होता की, किचनमधील फ्रिजचे कॉम्प्रेसर उडाल्यामुळे आसपासच्या साहित्याचेही मोठे नुकसान झाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे स्वयंपाक घरात स्फोट होऊन आग लागली तेव्हा तिथे गॅसचे काही सिलिंडरही होते. पुष्पक शिंगणे यांनी प्रसंगावधान राखून हे सिलिंडर वेळीच बाहेर काढले. त्यामुळे पुढील संकट टळले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!