अकोला दिव्य न्यूज : राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याचे चित्र दिसत असून निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर 2022 आधीचं आरक्षण कायम ठेवायचा आदेश देत, येत्या चार महिन्यांत संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश १० मे २०२५ रोजी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहे. त्यानुसार निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार टप्प्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार टप्प्यात होणार असल्याची चर्चा असून त्यानंतर पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचनेचं काम सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतरही सर्व स्पष्ट होईल.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक पडद्यामागे राजकीय घडामोडी सुरु आहेत. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक युती की आघाडीत लढायची ? याबाबतही प्रत्येक पक्षात विचारमंथन होत आहे. त्यातून काय निर्णय घेतला जातो ते आगामी काळात स्पष्ट होईलच.

राज्यातील अनेक महापालिकांमध्ये दोन, तीन तर काही ठिकाणी 5 वर्षांपासून प्रशासनाकडून कारभार चालवला जातोय.आधी कोरोना संकट, यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी यामुळे निवडणुकांना विलंब झाला. दरम्यान, या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो? याबाबत उत्सुकता आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं होतं. पण सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. तर महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. आता काही महिन्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचा आता नेमका काय मूड आहे? महाराष्ट्राच्या जनता महायुती की मविआ, यापैकी कुणाला जास्त पसंत करते ते स्पष्ट होणार आहे.