अकोला दिव्य न्यूज : Railway Ticket Price Increase : भारतीय रेल्वे विभाग रेल्वेच्या प्रवास भाड्यात मोठी वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. १ जुलैपासून भारतीय रेल्वे प्रवासी भाडे वाढ करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास आता महागणार आहे. रेल्वेने भाडेवाढ केल्यास याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. १ जुलैपासून रेल्वे प्रवाशांना एक्स्प्रेसने प्रवास करायचा असेल तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मागील काही वर्षांत भारतीय रेल्वेने प्रवास भाड्यात वाढ केली नव्हती. मात्र, आता भारतीय रेल्वेचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने द इकोनॉमिक टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, ही भाडेवाढ ही किरकोळ स्वरुपाची असेल, असंही सांगितलं जात असून १ जुलै २०२५ पासून हा निर्णय लागू होणार असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, एसी,नॉन एसी आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी ही भाडेवाढ प्रति किलोमीटर १ पैशाने वाढवली जाईल, तसेच एसीसाठी ही भाडेवाढ प्रति किलोमीटर २ पैशाने वाढवली जाईल. तसेच रेल्वेच्या उपनगरीय तिकिटांमध्ये कोणत्याही स्वरुपाची भाडेवाढ केली जाणार नाही. तसेच द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी देखील भाडेवाढ केली जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

एसी ते नॉन-एसी १ जुलैपासून कशी असेल भाडेवाढ?
-उपनगरीय रेल्वेच्या प्रवासात कोणतीही भाडेवाढ होणार नाही.
-मासिक हंगामी तिकिटांचे दर बदललेले राहतील.
-द्वितीय श्रेणीमध्ये ५०० किमी पर्यंतच्या अंतरासाठी भाडेवाढ होणार नाही.
-द्वितीय श्रेणीमध्ये ५०० किमी पेक्षा जास्त अंतरासाठी प्रति किलोमीटर अर्धा पैसे भाडे वाढेल.
-मेल आणि एक्सप्रेस (नॉन-एसी) गाड्यांमध्ये प्रति किलोमीटर १ पैशाने भाडे वाढेल.
-एसी श्रेणीमध्ये प्रति किलोमीटर २ पैशाने भाडे वाढेल.
दरम्यान, भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून तात्काळ रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार आवश्यक करण्याचा निर्णय घेतला आहे. १० जून २०२५ रोजी जारी केलेल्या निर्देशाद्वारे रेल्वे मंत्रालयाने सर्व रेल्वे झोनना या संदर्भातील निर्देश दिलेले आहेत. तसेच रेल्वेच्या अधिकृत सूचनेत म्हटलं आहे की १ जुलै २०२५ पासून तात्काळ योजनेअंतर्गत तिकिटे फक्त आधार प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच बुक केली जाऊ शकतात.