अकोला दिव्य न्यूज : जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री.राजराजेश्वर मंदिराला तिर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आ. साजिद खान पठाण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, नुकतेच नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या कक्षात पार पाडलेल्या बैठकीत राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रधान सचिव गोविंदराज, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि महानगर पालिकेचे आयुक्त सुनील लहाने हे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हजर होते अशी माहिती आ. साजिद खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून अकोल्याचे आराध्य दैवत श्री. राज राजेश्वर भगवान यांच्या मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात यावा अशी भावना नागरिक व्यक्त करीत होते. सदर मागणीला अनुसरून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच अधिवेशनात (हिवाळी अधिवेशन २०२४ ) मध्ये राज राजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली होती. तदनंतर पुन्हा मार्च महिन्यात राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात सदर मुद्दा लावून धरत हा अकोलेकरांच्या श्रद्धेचा विषय असून राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा लवकरात लवकर प्रदान करीत मंदिर परिसराचा विकासा करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती. तर गेल्या १५ दिवसांआधी राज्याचे उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीत सुद्धा आ. पठाण यांनी सदर मुद्दा लावून धरला होता.
त्यावेळी ना. अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर राज राजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येणार असल्याचा शब्द आ. पठाण यांना दिला. अखेर बुधवारी आ. पठाण यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नुकतीच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्या कक्षात पार पाडलेल्या बैठकीत राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार हे हजर होते तर अकोल्यावरून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मनपाचे आयुक्त सुनील लहाने व जिल्हा नियोजन अधिकारी सोनखासकर उपस्थित होते, अशी माहिती आ. पठाण यांनी दिली.
यावेळी प्रकाश तायडे, डॉ. प्रशांत वानखडे, महेंद्र गवई, मोहम्मद इरफान, मनीष हिवराळे, पराग कांबळे, आकाश कवडे, कपिल रावदेव, गणेश कळसकर, सागर कावरे, रवी शिंदे, राहुल सारवान, अंकुश तायडे, मोईन खान, विजय जामनीक, अभिजित तवर, बाळासाहेब काळे, संतोष झांझोट, ऋषिकेश जामोदे, विनोद मराठे, बाळू क्षीरसागर, यांसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भक्तांच्या श्रद्धेचा आदर – गेल्या अनेक महिन्यांपासून अकोल्याचे आराध्य दैवत श्री. राज राजेश्वर भगवान मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा आणि मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होऊन तीर्थक्षेत्रात समावेश करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील समस्त भाविक भक्तांची होती, बुधवारी अखेर राज्य सरकारने याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद देत भक्तांच्या श्रद्धेचा आदर करीत राज राजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान केला यासाठी राज्य सरकारचे मनापासून आभार अशी प्रतिक्रिया आ. पठाण यांनी यावेळी व्यक्त केली.