अकोला दिव्य न्यूज : वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांना मागून कारने धडक देऊन त्यानंतर चाकूने भोसकून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नवसारी टी पाॅइंट ते चांगापूर फाट्यादरम्यान शनिवारी हा रक्तरंजित थरार घडला असून पोलिसांनी दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मृताच्या अंगावर शस्त्राने भोसकल्याचे तब्बल १२ पेक्षा अधिक खोल घाव आहेत.

पोलिस सूत्रांनुसार, अमरावती येथील जमील कॉलनी येथे राहणारे अब्दुल कलाम (वय५६) सायंकाळी दुचाकीने वलगाव ठाण्यात कर्तव्यावर जात होते. नवसारी टी पॉइंटजवळ रेकी करीत उभ्या असलेल्या आरोपींनी भरधाव कार मागून कलाम यांच्या दुचाकीवर घातली. कारने अनेकदा धडक दिली. त्यामुळे कलाम हे रक्तबंबाळ स्थितीत कोसळले. ते कोसळताच अज्ञात आरोपींनी त्यांच्या सर्वांगावर धारदार शस्त्राने घाव घातले, असा घटनाक्रम समोर आला आहे. आरोपींची कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले.
मुुलगी शनिवारीच बनली फिजिओथेरपिस्ट : अब्दुुल कलाम यांच्या मुलीने शनिवारीच फिजिओथेरपिस्टची परीक्षा उत्तीर्ण केली. त्या आनंदात कलाम यांनी दुपारी पोलिस ठाण्यात पेढे वाटले होते.
वादातून खून?: २१ जूनला एहसानउद्दीन सिराजउद्दीनच्या तक्रारीवरून कलाम यांचे भाऊ अ. सलाम व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून अ. कलाम यांना संपविल्याची प्राथमिक माहिती आहे.