अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बर्मुडा घालून सिगारेट पीत आहेत आणि समोर एक बॅग दिसत आहे. या बॅगमध्ये पैसे असल्याचा दावा केला जात आहे. तसेच बाजूला आणखी एक बॅग उभी असल्याचे दिसत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात एका बॅगमध्ये पैसे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले असून राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

पैसे असते तर अलमारीमध्ये ठोसले असते
व्हिडिओ काय दाखवतो आहे की माझे घर आहे, माझी बेडरूम आहे, माझा लाडका कुत्रा आहे आणि एक बॅग तिथे ठेवली आहे. याचा अर्थ मी प्रवास करून आलो आहे आणि मी बेडवर बसलो आहे. अरे मूर्खानो, पैसे असते तर अलमारीमध्ये ठोसले असते. परंतु, यांना कपड्याची बॅग सुद्धा पैशांची बॅग वाटते. यांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या विमानातून खाली उतरून जात होते आणि त्यांचे बॉडीगार्ड ज्या काही बॅगा घेऊन चालले होते, त्यात पण यांना पैसे असल्याचे वाटले होते.
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, आमच्याकडे मातोश्री 1, मातोश्री 2 नाही. माझे मतदारसंघातील प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्यांना स्वागत असते. कार्यकर्ते असतात, एखाद्याने उत्साहाच्या भरात व्हिडिओ काढला असेल. माझ्याकडे कोणालाही चिठ्ठी देऊन बोलावले जात नाही. कार्यकर्त्यांसाठी आम्ही आहोत. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवले आहे, तुम्ही कार्यकर्ता म्हणून रहा.