अकोला दिव्य न्यूज : लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी आलेल्या प्रसिद्ध व सरकारी वकील उज्वल निकम यांचे खासदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार व्यक्तीची राज्यसभेवर नियुक्ती केली असून, त्यासंदर्भातील अधिसूचनाही निघाली आहे.

राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन चार सदस्यांची नियुक्ती केली. यात प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मिनाक्षी जैन आणि केरळमधील सामाजिक कार्यकर्ता सी. सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता. लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यापर्यंत वकील उज्वल निकम यांची मोलाची भूमिका राहिली होती. उज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून उज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. या संदर्भातील माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचं वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.