अकोला दिव्य न्यूज : वस्तू खरेदी-विक्रीचा प्रत्यक्षपणे कुठलाही व्यवहार न करता मोठ्या टक्केवारीत कमिशन देऊन व घेऊन ‘GST’ नोंदणीकृत देयके देणारा अकोला येथील प्रतिक तिवारीला जवळपास १० कोटी रुपयांचा कर चोरीप्रकरणी अटक करण्यात आल्याने व्यापारी क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, तिवारीला कमिशन देऊन घेतलेली जीएसटीची देयकांचे इनपुट क्रेडिट मिळण्यासाठी शासनाकडे सदर बिल सादर केलेले अकोल्यातील जवळपास १० व्यावसायिकांना जीएसटी विभागाने काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये शहरातील मोठे शासकीय कंत्राटदार, बिल्डर्स व मोठे व्यापारी असल्याचे सांगितले जात आहे.

अकोल्यात उघडकीस आलेल्या, फक्त जीएसटीची बिले देऊन व त्याबदल्यात कमिशन घेऊन उरलेली रक्कम परत करण्याचा तिवारीचा या गोरखधंद्यात अडकून पडलेल्या अनेकांचे आता वांधे झाले आहेत. जीएसटी विभागाकडून किमान १५ टक्के दंड व त्यावर शास्ती आकारून सर्व संबंधितांकडून वसूली केली जाणार आहे.या व्यवहारात काहीजणांची त्यांना घेणे असलेली रक्कम परत मिळाली नसल्याची चर्चा आहे.
अकोला येथील डाबकी रोड भागात प्रतिक तिवारीने २९ मार्च २०१९ पासून स्वामी सार्थ किराणा या नावाने सिमेंट, स्टील रॉड्स, हार्डवेअरसाठी जीएसटी कायद्याखाली नोंदणी केली होती.सिमेंटवर २८ व लोखंडावर १८ टक्के जीएसटी असून, दरम्यान खामगाव येथील आकाश अडचुळे व खामगाव येथील सज्जन पुरीचे अनिस शाह, ग्रोव्हर शाह यांनी प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता फक्त तिवारीला बिले दिली. कराचा भरणा न करता जीएसटी पोर्टलवर बिलाची माहिती नमूद केली होती.
या नोंदीवरून सीएसटीच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने खामगाव येथे धाड टाकून झडती घेण्यात आली असता, त्यांनी तिवारीला खोटी बिले दिल्याची कबुली दिली. तेव्हा या व्यवसायाच्या संशयास्पद व्यवहारावर जीएसटी विभाग नजर ठेवून होता. महालक्ष्मी सेल्स या नावाने गिरीराज तिवारी यांचाही याच प्रकारच्या मालाच्या फेरविक्रीचा व्यवसाय जीएसटी कायद्याखाली याच पत्त्यावर नोंदविल्याची माहिती विभागाला होतीच. यासर्व माहितीनंतर तिवारी यांच्या व्यवहारावर करडी नजर ठेवली जात होती.

राज्यातील सात व्यापाऱ्यांकडून तिवारी यांनी खोटी बिले घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. कर्नाटक राज्यातील दोन व्यापाऱ्यांनी देखील जीएसटी कायद्याखाली नोंदणी केली व नंतर ती रद्द केली. त्यांच्याकडून खोट्या बिलाच्या आधारे ९.९७ कोटी टॅक्सचे इनपुट क्रेडिट विवरणपत्र घेतले.जीएसटी कायद्यान्वये गुन्हा हा असून यात एकंदरीत फसवणुकीची रक्कम पाच कोटींवर असल्याचे उघडकीस आले. फसवणुकीची रक्कम ५ कोटींवर असल्याने हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. अपर राज्य कर आयुक्तांनी अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार अकोला येथून तिवारी यांना अटक करून बुधवारी अमरावती येथील न्यायालयात हजर करण्यात आले. उघडकीस आलेल्या या प्रकरणी तब्बल ९.९७ कोटींची जीएसटीची चोरी झाली आहे.