अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील उदयोन्मुख बुद्धिबळपटू ईशान सौरभ सारडा याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करीत नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले आहे. अकोला महानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि अकोला येथील प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेत खेळल्या गेलेल्या चारही सामन्यात विजय मिळवत ईशानने १०० टक्के गुण मिळवले आणि अपराजित राहून स्पर्धेतील अग्रणी स्थान पटकावले. अवघ्या सात वर्षांच्या वयातील ईशान सारडा यांची ही कामगिरी केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर अकोला जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.

ईशानच्या यशाबद्दल शिक्षक आणि प्रशिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याचे धोरणात्मक कौशल्य, एकाग्रता व आत्मविश्वासाने स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले. माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यवसायीक सतिश सारडा यांचा ईशान हा नातू असून प्रतिथयश वकील अँड. सौरभ सारडा यांचा मुलगा आहे.
बुद्धिबळ जगतातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर ईशानने अशीच समर्पण आणि कठोर परिश्रमाने प्रगती केली तर तो भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिभा सिद्ध करेल.