अकोला दिव्य न्यूज : मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या देशाच्या युवा आधारस्तंभाना आजच्या अनाकलनीय सामाजिक परिस्थितीत सुरक्षित ठेवत सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी बालपणापासूनच परिश्रम घेणे काळाची गरज असल्याचे भावनाशील प्रतिपादन अकोला वन विभागाच्या सहायक वन संरक्षक नम्रता ताले यांनी केले. पंचायत समिती अकोला अंतर्गत भौरद केंद्रातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, मोरगाव भाकरे येथे विद्यार्थी सहभागातून “एक पेड माँ के नाम” या अभिनव वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ‘वृक्ष लागवड व दत्तक विधान’ सोहळ्याचे प्रसंगी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थिनी तथा शिक्षक व पालकवृंदाला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, मोरगाव भाकरेच्या प्रांगणात गावच्या प्रथम नागरिक सरपंच उमाताई माळी यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या काळसुसंगत कार्यक्रमाचा प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल आगरकर, सदस्य पांडुरंग भाकरे, उपसरपंच अर्चना चोपडे, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा उच्च श्रेणी मुख्याध्यापिका वनमाला चौके, सहायक शिक्षिका भावना अलकरी, लता गिते, नीता बिडवे, वैशाली कुळकर्णी, दर्शना सोनाग्रे, सरिता देवकाते यांची उपस्थिती होती.

सशक्त समाज निर्मितीसाठी शालेय जीवनापासूनच सामाजिक दायित्वाची जाण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादित करताना नम्रता ताले यांनी मानवी जीवनात वृक्षांचे महत्व अतिशय साध्या सोप्या भाषेत विद्यार्थी आणि पालक वर्गाचे गळी उतरवत आज मिळालेले झाड प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या ममतेने जोपासत त्याचा सांभाळ करावा व त्याचे संवर्धन करावे असे आवाहन केले व जिल्हा परिषद शाळेने या उपक्रमात सहभागी होत वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या दातृत्वाचा आणि समाजभानचा परिचय करून दिला असल्याचे प्रतिपादन नम्रता ताले यांनी केले.

शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका नीता बिडवे यांनी बदलत्या जागतिक हवामानाच्या परिस्थितीत दिवसेगणित वाढत जाणारे तापमान आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम विषद करताना वसुंधरेचा संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व जोपासना गरजेचे आहे व त्याच भावनेतून शिक्षक म्हणून कर्तव्यपूर्तीचा एक भाग म्हणजेच “एक पेड मा के नाम” हा वृक्ष लागवड उपक्रम असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी आपले गाव आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन प्रस्ताविकात केले.
याप्रसंगी शाळेमधील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींना पालकांसह प्रत्येकी एक झाड दत्तक देऊन त्याची जोपासना व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. याप्रसंगी अमलतास, कडूनिंब, कडू बदाम, बेल, वड, पिंपळ, आवळा आदी वृक्षांची रोपे गावकऱ्यांनी आवडीने स्वीकारत त्यांची लागवड व जोपासना करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका नीता बिडवे यांनी तर भावना अलकरी यांनी आभार मानले.