अकोला दिव्य न्यूज : नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला शहरातील विविध भागांतील विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करत होती. मात्र लग्नानंतर अवघ्या १ महिन्यात भांडण करून त्या पुरुषांकडून पैसे उकळण्यास सुरुवात करत असे आणि त्यांची आर्थिक व भावनिक फसवणूक करत होती. अशा प्रकारे तिने आतापर्यंत आठ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव समीरा फातिमा असून ती उच्चशिक्षित आहे आणि शिक्षक म्हणूनही काम करते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची, त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांची फसवणूक करायची. या प्रकरणात गुलाम पठाण यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षापासून फरार असलेल्या ‘लुटेरी दुल्हन’ ऊर्फ समीरा फातिमाला अखेर गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. तिचा पोलिस कोठडीतील कालावधी आज संपणार आहे. समीरा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची, त्यांच्याशी लग्न करून खोटे निकाहनामे दाखवून त्यांची फसवणूक करत होती. ती विवाहित पुरूषांना महिन्याभरातच खोट्या आरोपात फसवण्याच्या धमक्या देत होती. कोर्टकेस करत सेटलमेंटच्या नावावर मोठी रक्कम वसूल करत होती. ही फरार महिला सिव्हिल लाइन्स येथील टपरीवर चहा प्यायला आली असता पोलिसांनी तिला अटक केली आहे.
गिट्टीखदान पोलिसात गुलाम पठाण यांनी 24 मार्च रोजी या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या महिलेने 2010 पासून अनेक विवाहित पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. लग्नानंतर ब्लॅकमेल करत नवीन नवऱ्याकडून पैसे उकळायची. या महिलेने आतापर्यंत 8 लग्न केल्याचा आरोप गुलाम पठाण यांनी केला आहे.
आरोपी महिला एका शाळेत शिक्षिका
आरोपी महिला एका शाळेत शिक्षिका आहे आणि नवीन लोकांशी बोलायची तेव्हा त्यांना माझा घटस्फोट झालेला आहे, अशी खोटी माहिती द्यायची. त्यानंतर पुरुषांना जाळ्यात ओढायची. मला तुमचा सहारा द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहील असं म्हणत ती मुस्लिम पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. त्यानंतर लग्न करायला लावायची आणि पैसे वसूल करायची. तिने आतापर्यंत 50 लाख रुपयाची फसवणूक केली असल्याचेही पठाण यांनी म्हटलं आहे. आता या महिलेला अटक करण्यात आली आहे.