अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रात एकीकडे मराठी विरुद्ध हिंदी हा वाद चालू असताना त्यावरून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा मुद्दाही चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. काही इमारतीमध्ये परप्रांतीयांकडून स्थानिक मराठी नागरिकांना मारहाणीच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर हिंदी बोलण्यावरूनही वाद झाल्याचं दिसून आलं. या सर्व पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये एका कार्यक्रमात एका मराठी तरुणीनं केलेलं भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परप्रांतीयांनी कशा प्रकारे महाराष्ट्रातील स्थानिकांच्या नोकऱ्या हस्तगत केल्या व महाराष्ट्रातला मराठा तरुण कशा प्रकारे राजकारणात गुंग राहिला, यावर या तरुणीनं आक्रमकपणे केलेलं हे भाषण व्हायरल होत आहे.

बेळगावमध्ये ‘मराठा एकता एक संघटन’ या संघटनेच्या माध्यमातून आयोजित एका कार्यक्रमात आर्या गायकवाड या तरुणीचं हे भाषण आहे. आपल्या भाषणात तिने परकीय चालीरीती व भाषांचाही महाराष्ट्रातील मराठा समुदायावर कसा प्रभाव वाढू लागला यावर मुद्दे मांडले आहेत.
कानामागून आली आणि तिखट झाली म्हणावी तशी परकीय संस्कृती पूर्वापार चालत आलेल्या मराठ्यांच्या चालीरीतींवर कधी आरूढ झाली कधी कळलंच नाही. वाढदिवसाला दीर्घायुष्यासाठी करायचं औक्षण मागासलेपणाचं लक्षण मानत आपण केकवरच्या मेणबत्त्या विझवण्यात मोठेपणा मिरवत राहिलो. मराठ्याच्या लग्नसमारंभात उत्तर भारतीय रीतीरिवाज घुसखोरी करत आहेत. अठरापगड जातीत विभागलेल्या मराठा समाजाला ज्या मराठी भाषेनं एकत्र बांधून ठेवलं होतं, त्या मराठी भाषेवर आधी इंग्रजांनी इंग्रजी भाषेने आणि आता हिंदी भाषेनं घाला घातला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे”, असं या तरुणीनं आपल्या भाषणात म्हटलं आहे.
राजकारण आणि मराठा तरुण
दरम्यान, राजकारणात तरुणाईची दिशाभूल होत असल्याचा मुद्दा या तरुणीनं भाषणात उपस्थित केला. “राजकारण्यांना कळून चुकलंय की एक चपटी बाटली आणि चार हाडकं फेकली की मराठा तरुण लाळघोटेपणा करण्यात कसूर करत नाही. भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करत इतर समाजसंप्रदायी, परप्रांतीय तरुण स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होत सरकारी नोकऱ्या बळकावत असताना ‘अमुक तमुक नेत्याचा विजय असो’ अशा घोषणा देत मराठा तरुण मिरवणुकीत नाचण्यात दंग आहे”, अशी टिप्पणी या तरुणीनं तिच्या भाषणात केली आहे.
मराठी समाज व परप्रांतीय आक्रमण
याशिवाय, महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या रोजगारावर परप्रांतीयांमुळे कसा घाला घातला गेला, याचाही भाषणात या तरुणीनं उल्लेख केला आहे. “रस्ते का माल सस्ते में म्हणत रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या परप्रांतीय चप्पल-बूट विक्रेत्यांनी चर्मकार बांधवांच्या पोटावर पाय आणला. वापरा आणि फेकून द्या म्हणत रस्त्यावरच वाजवी दरात तयार कपडे विकत परप्रांतीयांनी शिंपी समाजाचा व्यवसाय गिळंकृत केला. दक्षिण भारतातून आलेल्या मोठमोठ्या ज्वेलरी आणि डायमंड शॉप्सनी सोनारांच्या खिशाला कात्री लावली. एअर कंडिशन्ड हेअर सलून्सनी नाभिकांना नेस्तनाबूत केलं. उत्तर भारतातून आलेल्या सुतारांनी इंटिरियर डिझायनर्सला हाताशी धरून स्थानिक सुतारांच्या धंद्यावर हातोडा हाणला. मराठ्यांच्या हातूनस्थानिक सुतारांच्या धंद्यावर हातोडा हाणला. मराठ्यांच्या हातून उद्योगधंदे इतरांनी हातोहात लांबवले. मराठी चित्रपटाला सिनेमागृह उपलब्ध होत नाही. मिळाले तर ते चालत नाहीत. .अशावेळी बहुसंख्य कुटुंबांनी आपली दुकानं, घरं गुजराती-मारवाडी-सिंधी समाजाला देऊन आपण भाडी खाण्यात धन्यता मानतो, असे मुद्दे या तरुणीनं उपस्थित केले आहेत.