अकोला दिव्य न्यूज : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची (कर वाढ) जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत आहे. ट्रम्स यांनी भारतावरही मोठ्या प्रमाणावर कर लादले आहे. त्या करामुळे सोन्याच्या दरासह भारतातील सराफा क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाबाबत ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)ने महत्वाचे भाष्य केले आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. तसेच भारताकडून दंड वसूल करण्याबाबत धमकीवजा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा (६ ऑगस्ट) रोजी केली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. या भरमसाठ आयात शुल्कामुळे ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)चे राष्ट्रिय अध्यक्ष राजेश रोकडे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
रोकडे म्हणाले, भारतीय सोन्याच्या दागिन्यांच्या अमेरिकेतील निर्यातीवर २५ टक्के कर लादले गेले आहे. आता २७ ऑगस्टपासून लागू होणारा अतिरिक्त २५ टक्के कर या क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे. या तीव्र वाढीमुळे भारतातील सराफा व्यवसायिकांद्वारे निर्मित उत्पादने केवळ अमेरिकन बाजारपेठेत लक्षणीयरीत्या कमी होतील. सोबत सराफा व्यवसायातिक जागतिक स्पर्धेवरही या करामुळे गंभीर परिणाम होईल. भारतात सराफा क्षेत्रात हजारो कुशल कामगार कार्यरत आहे. त्यांच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबियांची उपजिविका चालते.
राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे काय म्हणाले?
अमेरिकेच्या कर वाढीमुळे सोने- चांदीसह दागिन्याच्या निर्यातीवल अवलंबून असलेल्या भारतातील हजारो कुशल कारागिरांच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. हे कारागीर – बरेचसे दुर्लक्षित समुदायातील आहे. भारतात सराफा व्यवसायावर अवलंबून असलेले कारागिर हे वर्षानुवर्षे जुन्या तंत्रांचे जतन करतात. अमेरिकेच्या ५० टक्के करामुळे हजारो कामगारांवर नोकऱ्या गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सरकारला तातडीने पावले उचलून सराफा व्यवसायिकांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेसोबत व्यापार वाटाघाटीमध्ये सहभागी होऊन भारतीय हस्तकला दागिन्यांमध्ये भारताचे जागतिक नेतृत्व कायम ठेवण्याची विनंती करतो, असेही ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)चे राष्ट्रिय अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले.