अकोला दिव्य न्यूज : संत परंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणारा आषाढी-2025 निमित्त प्रकाशित होणार्या ‘रिंगण’ च्या संतशिरोमणी सेना महाराज विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन उद्या रविवार, 10 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता कमिटी हॉल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विदर्भ साहित्य संघ; शाखा अकोला आणि डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन, नागपूर तर्फे करण्यात येत आहे.

ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी हा अंक संपादित केला आहे. ‘रिंगण’ चे प्रकाशन आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण संस्था चालक संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष अॅड. विलास वखरे तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघ; शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे हे उपस्थित राहणार आहेत.

‘रिंगण’ या विशेषांकवर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व समीक्षक प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके भाष्य करणार आहेत. संत साहित्याला महत्त्वपूर्ण योगदान देणार्या ‘रिंगण’ चे गेल्या 13 वर्षांपासून कुशल व यशस्वी संपादन करणारे ज्येष्ठ पत्रकार व संपादक सचिन परब यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
