अकोला दिव्य न्यूज : ‘अकोला महोत्सव २०२५’ अकोल्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक ओळखीला नवा आयाम देणार आहे. ‘निलेश देव मित्र मंडळ’ व ‘अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने, अकोला जिल्हा परिषद, अकोला महानगरपालिका व राज्य शासनाच्या सहकार्याने हा महोत्सव ऐतिहासिक पद्धतीने पार पडणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात असून हा महोत्सव केवळ सांस्कृतिक महोत्सव न राहता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक जाणीव व रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित असेल.या कार्यक्रमात विक्रमी गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये ५० हून अधिक शाळातील तब्बल १० हजार विद्यार्थी जवळपास १० टन शुद्ध शाडू मातीपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश मूर्ती तयार करण्यात येणार आहे.ही जगातील सर्वात मोठी शाळकरी शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा ठरण्याची शक्यता आहे.

विजेत्यांच्या मूर्ती सोबतच उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून त्या ‘नंद गणपती संग्रहालय, चिखलदरा’ येथे आयुष्यभरासाठी जतन केल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला राष्ट्रीय ओळख मिळणार आहे.
POP मूर्तींमुळे होणारा पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी शाळा-शाळेत प्रबोधन मोहीम राबवली जात आहे. कार्यशाळेत शरद कोकाटे, निशिकांत बडगे, दिनेश पारेख, कल्पना राव, प्रतिभा मानधने, अखिलेश पारीख, सौ. अमृता कुशल सेनाड, प्राचार्य गजानन बोबडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष आकर्षण म्हणून १० वर्षीय बाल पर्यावरण कार्यकर्ती पूर्वा बगळेकर हिचाही सहभाग असेल. सर्व विद्यार्थ्यांना साहित्य मोफत, वॉटरप्रूफ डोम, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा यंत्रणा अशा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
१७ ऑगस्टला आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात ५०+ कंपन्या सहभागी होत असल्याने हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ऑन-द-स्पॉट मुलाखती व तात्काळ निवड प्रक्रिया होणार असून याच ठिकाणी करिअर मार्गदर्शन सत्र होणार आहे. या रोजगार मेळाव्याचे समन्वयक सोमेश्वर मोटे असून
अकोला इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल आणि सचिव नरेश बियाणी यांचाही सहभाग राहणार आहे.

१७ ऑगस्ट रोजी सायंकाळी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे ‘भारतीय संस्कृती व संस्कृत भाषेचे आधुनिक जीवनातील स्थान’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर नृत्य, संगीत, साहित्यवर सादरीकरण आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा होईल. या उपक्रमामागे प्रदीप नंद आणि डॉ. माधवराव देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.असे निलेश देव यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश देव मित्र मंडळ कार्यकारीणीतील जयंतराव सरदेशपांडे, निलेश देव, डॉ. माधवराव देशमुख, मनोज खंडेलवाल, नरेश बियाणी, शार्दूल अनंत दिगंबर, डॉ.आर.बी. हेडा, सीमा बक्षी, पुरुषोत्तम मालाणी, सोमेश्वर मोटे, सौ. पल्लवी कुलकर्णी, विनोद देव, अतुल पाटील, गणेश मैराळ, सौ. रश्मी देव, डॉ. स्नेहा गोखले, शामराव कुलकर्णी, प्रकाश जोशी, कुशल सेनाड, अजय शास्त्री, आशिष गोरे, रामहरी डांगे, राजेंद्र गुन्नलवार, राम उमरेकर, निलेश दूधलम, नरेंद्र परदेशी, शैलेश देव, सुनिल देशपांडे, विजय वाघ, आशिष तिवारी, राजु कनोजिया, निलेश पवार, भास्करराव बैतवार, शशीकांत हिवरखेडकर परिश्रम घेत आहेत.असं अनिल कुकुलवार यांनी कळविले आहे.