अकोला दिव्य न्यूज : भारतीय संस्कृतीतील राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधोरेखित करणारा अखंड भारत संकल्प दिवस यंदा अकोल्यात विशेष उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार असून संस्कृती संवर्धन समिती, अकोला यांच्या वतीने यानिमित्त उद्या गुरुवार १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता खंडेलवाल भवन येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते सुनील देवधर असून, ते राष्ट्रीय संयोजक पूर्वोत्तर भारत संपर्क प्रकोष्ठ तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय संयोजक आहेत. “अखंड भारत – संकल्प ते साकार” या विषयावर ते ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक पैलूंचा सखोल ऊहापोह करणार आहेत. अखंड भारताच्या संकल्पनेमागील वैदिक काळापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्यानंतरची फाळणी व त्याचे परिणाम, तसेच भारताच्या भविष्यातील एकात्म दृष्टिकोनाबाबत त्यांनी देशभरात घेतलेल्या व्याख्यानांना व्यापक प्रतिसाद लाभला आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अकोल्यातील विविध समाजघटक, विद्यार्थी, शिक्षक, तरुणाई, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते व सामाजिक संघटनांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा समितीचा उद्देश आहे. या कार्यक्रमातून अखंड भारताच्या पुनःस्थापनेबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रनिष्ठा, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक ऐक्याचा भाव अधिक दृढ होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, स्वागत समिती अध्यक्ष, अरविंद देठे यांनी आवाहन केले आहे की, “अखंड भारत” या महान संकल्पनेच्या यशस्वी साकारासाठी प्रत्येक नागरिकाची मानसिक व वैचारिक तयारी आवश्यक आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण व्याख्यानाला शहरातील सर्व समाजघटकांनी उपस्थित राहून राष्ट्रीय एकात्मतेच्या या चळवळीत सहभाग नोंदवावा.