Friday, August 15, 2025
HomeUncategorizedभाजपचे खा.रूढी यांचा अमित शहांना मोठा धक्का ! प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शहांच्या उमेदवाराचा...

भाजपचे खा.रूढी यांचा अमित शहांना मोठा धक्का ! प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शहांच्या उमेदवाराचा पराभव

अकोला दिव्य न्यूज : दिल्लीच्या प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडियाच्या सचिव पदाची निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. यामध्ये भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी बाजी मारली. भाजप विरुद्ध भाजप अशा झालेल्या निवडणुकीत रुडी यांनी त्यांच्याच पक्षाचे व गृहमंत्री अमित शहा यांनी पाठिंबा दिलेले माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. संजीव बालियान यांचा १०० पेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

१२ ऑगस्टला झालेल्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केलं होतं. रुडी यांनी १०० हून अधिक मतांनी विजय साकारला. त्यांच्या पॅनलच्या सदस्यांनीदेखील विजयाची नोंदवला. या निवडणुकीत आजी, माजी खासदारांनी मतदान केलं होतं. बालियान हे अमित शहांचे उमेदवार मानले जात होते.

भाजपच्या बहुतांश खासदारांनी बालियान यांनाच मतदान केलं होतं. पण काँग्रेससह अन्य पक्षांनी रुडी यांनी भरभरुन पाठिंबा दिला.

प्रशिक्षित पायलट असलेले, सर्वाधिक तास विमान चालवण्याचा विक्रम नावावर असलेले रुडी यांनी ऐतिहासिक निवडणूक जिंकण्यासाठी डोअर टू डोअर प्रचार केला. हा आपल्या पॅनलचा विजय असल्याचं रुडी यांनी सांगितलं. ‘मी १०० मतांनी जिंकलो आहे. त्याला १००० मतदारांनी गुणल्यास ही संख्या १ लाखाच्या घरात जाते.

माझ्या पॅनलमध्ये भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि अपक्ष खासदार होते. हा माझ्या अनेक दशकांच्या मेहनतीचा परिणाम आहे,अशा भावना रुडी यांनी बोलून दाखवल्या.

बालियान हे भाजपचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या मागे अमित शहांनी ताकद उभी केली होती. त्यामुळे बालियान यांचा पराभव अमित शहांचाच पराभव असल्याचं बोललं जात आहे. तर काहींच्या मते रुडी यांचा विजय निश्चित होता. बहुतांश खासदार त्यांच्या बाजूनं होतं. त्यांची लोकप्रियता असल्यानं ते निवडून येणारच होते.
विरोधकांनी रुडी यांना साथ देत एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वत: रुडी यांच्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा दिल्लीत आहे. काही दिवसांपूर्वीचा संसद भवन परिसरातील व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यातून अनेक गोष्टींचे संकेत मिळतात. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधण्याआधी रुडी आणि राहुल गांधी भेटले. दोघांनी हसत हसत हस्तांदोलन केलं होतं. भाजप खासदारानं भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा केलेला पराभव याकडे भाजप अंतर्गत कलह या दृष्टीनंदेखील पाहिलं जात आहे.

रुडी यांना काँग्रेस आणि विरोधी पक्षातील खासदारांचा पाठिंबा मिळाला. बालियान भाजपचे अधिकृत उमेदवार होते. त्यामुळे विरोधकांनी बालियान यांच्या विरोधात लढणाऱ्या रुडी यांच्या पारड्यात मतांचं दान टाकलं. १२ ऑगस्टला मतदान होण्याआधी अनेक दिवस डिनर डिप्लोमसीदेखील सुरु होती.

भाजपच्याच दोन नेत्यांचा आमनासामना झाल्यानं भाजपचे खासदार द्विधा मनस्थितीत होते. पहिल्यांदाच भाजप विरुद्ध भाजप लढत होत असल्यानं आमच्यासारखे नवे खासदार संभ्रमात असल्याचं भाजप खासदार कंगना रणौत निवडणुकीआधी म्हणाल्या होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!