Sunday, August 31, 2025
HomeUncategorizedशासनाची आयटीसी आधारे 47 कोटी रुपयांनी फसवणूक ! विवेक मौर्यला अटक

शासनाची आयटीसी आधारे 47 कोटी रुपयांनी फसवणूक ! विवेक मौर्यला अटक

अकोला दिव्य न्यूज : GST Fraud News : बनावट इनपुट क्रेडीट टॅक्सच्या आधारे (आयटीसी) ४७ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. केंद्रीय वस्तू सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील ठाणे आयुक्तालयाच्या कर-चुकवेगिरी विरोधी शाखेने ही कारवाई केली. विवेक मौर्य असे व्यापाऱ्याचे नाव असून तो या प्रकरणात सुत्रधार आहे. त्याच्या घरातून काही पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती सीजीएसटी विभागाने दिली..

तपासात उघड झाले की मेसर्स केएसएम एंटरप्रायझेस, ज्याचे संचालन विवेक मौर्य करतात, त्यांनी कोणताही वस्तू किंवा सेवा पुरवठा न करता खोटे आयटीसी दाखवून ते पुढे मंजूर केले होते. तांत्रिक आणि अत्याधुनिक विदा विश्लेषणाच्या आधारे हे प्रकरण उघडकीस आले. पथकाने त्याच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात विविध बँक खात्याच्या पुस्तिका, धनादेश, काही मोबाईल आणि बनावट कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे यासह गुन्हे सिद्ध करणारे पुरावे जप्त करण्यात आले. त्याची चौकशी केली असता, तो या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याची कबूली त्याने दिली. तसेच त्याने बेकायदेशीर व्यवहारांचा थेट लाभ उचलल्याचे कबूल केले.

त्याला १९ ऑगस्टला अटक करण्यात आली. ठाणे येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता त्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला असून वस्तू आणि सेवा कर चोरीत गुंतलेल्या व्यक्ती व संस्थांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!