अकोला दिव्य न्युज ब्युरो : नुकत्याच झालेल्या कंकणाकृती सूर्य ग्रहणाचा लाभ आपल्या भागात घेता आला नाही, परंतु शनिवार, २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणारे खंडग्रास चंद्रग्रहण मात्र संपूर्ण भारतातून बघता येणार आहे. या खगोलीय घटनेत सव्वा तास चंद्र पृथ्वीच्या छायेत असणार आहे.
ज्यावेळी सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वीच्या सावलीत चंद्र आल्याने काही कालावधी पर्यंत चंद्रबिंब काही अंशी आपण पाहू शकत नाही. अर्थातच हा एक नैसर्गिक सावल्यांचा खेळ सुमारे सव्वा तास नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.
येत्या शनिवारी मध्यरात्री नंतर पश्चिम आकाशात वरच्या भागात रात्री ०१:०५ वा. या ग्रहणाचा आरंभ होऊन उत्तर रात्री ०२:२३ वा.या खगोलीय घटनेचा शेवट होईल. हा आकाश नजारा आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया व पूर्व अमेरिका यातील काही भागात बघता येईल.
आकाशातील राशीचक्रातील पहिल्याच राशीत अश्विनी नक्षत्राजवळ चंद्र झाकला जाईल. याच राशी समुहात सध्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असल्याने अश्विनी, गुरु ग्रह व छायांकीत चंद्र असा त्रिकोण बघता येईल. मराठी चांद्रमासात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ठराविक नक्षत्रात असतो. आकाशातील अनेक घडामोडी फार आकर्षक व मनमोहक असतात,त्याचा आनंद आपण अवश्य घ्यायला हवा