Thursday, December 12, 2024
Homeसंपादकियआज मोदींच्या 'ब्लॅक मनी' बलूनचा 7 व्या वर्धापन दिनानिमित्त….

आज मोदींच्या ‘ब्लॅक मनी’ बलूनचा 7 व्या वर्धापन दिनानिमित्त….

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : नाझी हुकूमशहा हिटलरच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक असलेल्या ‘ग्लोबेल्स’चा एकच मूलमंत्र होता, ‘एक चुकीची गोष्ट १० वेळा ठासून सांगितली की, ११ व्यांदा सर्वचजण ‘ती’ खरी मानतात. हिटलरही नेहमी विरोधकांच्या विरोधात याच ग्लोबेल्सतंत्राचा वापर करुन विरोधकांना नामोहरण करीत असे. ग्लोबेल्सतंत्र म्हणजे, सातत्याने प्रतिस्पर्ध्याबद्दल ठासून अपप्रचार करणे. खोटे बोला, ताकदीने बोला आणि रेटून बोला हाच ग्लोबेल्सतंत्राचा आत्मा आहे. लोकसभा २०१४ च्यानिवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस व विरोधकांसाठी या ग्लोबेल्सतंत्राचा अत्यंत चोख आणि सावधपणे असा वापर केला की, देशात ६० वर्षामध्ये काँग्रेसने घोटाळ्याशिवाय काहीच केले नाही, हे लोकांच्या मनामध्ये खोलवर रुजले. या ग्लोबेल्सतंत्राने बहमतापेक्षा एक जागा जास्त घेवून, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले.

लोकसभेत कमकुवत विरोधक व एकहाती सत्तेने देशाचा कारभार लोकशाही नव्हे तर हुकूमशाही पद्धतीने सुरू झाला. हिटलरच्या साथीला ग्लोबेल्स तर मोदींना अमित शहा साथीला असल्याने भाजपतील जेष्ठनेत्यांना बाजूला सारले. मोदींच्या कारभाराने ‘देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती’ असल्याचे अडवाणींनी जाहीरपणे सांगितले होते. पण नंतर दबाव आल्याने अडवाणींनी आजपर्यंत कोणतेही भाष्य केले नाही. एकमात्र खरे की, अडवाणींनी केलेल्या वक्तव्याचा प्रत्यय आता दिसून येत आहे.

ना.गडकरी यांचा अपवाद वगळता गत १० वर्षात एकाही मंत्र्यांनी स्वतंत्रपणे निर्णय जाहीर केल्याचे दिसून आले नाही. आजही बहुतांश केंद्रीय मंत्र्यांची नावे सर्वसामान्यांना माहीत नाही. विदेशमंत्रीपेक्षा जास्त विदेशवारी मोदींचीच ! अशी एक ना अनेक उदाहरणे असून, मागील १० वर्षात केंद्रीय मंत्र्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

देशाची जीवनवाहिनी असलेल्या आर्थिक क्षेत्राबाबत आजही अर्थशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला जात नाही. २०१४ पासूनच सब कुछ मोदी असल्याने, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदींनी ‘नोटबंदी केली. पण नोटबंदीतून काय निष्पन्न झाले ? या प्रश्नाचे उत्तर शोधणं कठीण आहे. चलनात असलेल्या ९९ टक्के नोटा बँकेत परत आल्या होत्या. अर्थव्यवस्थेत तेव्हा चलनात असलेल्या १ हजार रुपयांच्या ६३२.६ कोटी इतक्या रकमेच्या नोटा पैकी केवळ ८.९ कोटी रकमेच्या नोटा परत आल्या नाहीत. म्हणजे, १ हजार रूपयांच्या केवळ १.४ टके नोटा बँकेत परतल्या नाहीत.

अनेक कारणांमुळे बाद झालेल्या नोटांचा भरणा होवू शकला नसावा. तरीही मोदी भक्तांना दिलासा देण्यासाठी या नोटांना काळेधन गृहीत धरले, तर केवळ १६ हजार कोटी रुपयांचे काळेधन चलनातून बाद झाले आहे.रिजर्व्ह बॅंकेच्या अहवालात नमूद हे नमूद करुन नवीन नोटांच्या छपाईसाठी तब्बल २१ हजार कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगितले आहे. म्हणजे १६ हजार कोटी रूपयांच्या कमाईतून २१ हजार कोटींचा खर्च वजा केल्यावर देशाला तब्बल ५ हजार कोटीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. हा निर्णय ‘चार आणे की मुर्गी बारा आणे का मसाला ‘सारखा ठरला ना !

इतिहासात मोहम्मद तुघलक नंतर नोटबंदीचा निर्णय मोदींच्या हुकूमशहा व अव्यवहारीक कारभाराचे दुसरे सर्वोत्तम उदाहरण असून आपलं अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ३ लाख कोटीचं काळेधन पकडल्याची सपशेल खोटी माहिती दिल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने उघड केले.

पाचशे व हजाराची नोट ८/११ च्या मध्यरात्रीपासून व्यवहारातून बंद करतांना, काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट चलन आणि दहशतवाद यांचा बिमोड करण्यासाठीच हा निर्णय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते. देशाच्या विकासाआड येणाऱ्या या चार असंवैधानिक कृत्यांचा कायम बंदोबस्त होणे आवश्यक असल्याने, सर्वसामान्यांच्या मनातही या सर्व प्रकाराबद्दल प्रचंड चीड असल्याने पंतप्रधानांना समर्थ साथ दिली.तर या निर्णयाने येणाच्या काळात होणाऱ्या दूरोगामी विपरीत परिणामाची कल्पना, तेव्हाच अर्थतज्ञांनी दिली होती. मात्र मोदीभक्तांनी त्यांना वेड्यात काढले.

नोटबंदीच्या हत्याराने दहशतवाद, काळा पैसा व भ्रष्टाचाराचा खात्मा तर झाला नाही.पण ‘आजारापेक्षा उपचार महाग’ झाला. दहशतवाद, भ्रष्टाचार व बनावट नोटा या समस्या आजही कायमच आहे.बनावट नोटा दहशतवाद्यांना सहाय्य करणाऱ्या असल्याचे, मोदी यांनी सांगितले होते.मात्र केवळ चारशे कोटी रूपयांचे बनावट चलन असल्याचे, रिझर्व्ह बँक आणि एनआयने स्पष्ट केल्याने बनावट चलनाचे प्रमाण केवळ ० . ०२८ टक्के एवढेच असतांना, अतिरेकी कृत्यांना लगाम घालण्यासाठी केलेल्या नोटबंदीने मात्र देशातील कुटीर. लघु व मध्यम उद्योग आणि लहान व मध्यम व्यवसायाची पुरती वाट लागली.

गेल्या आर्थिक वर्षात बनावट नोटांमध्ये २१.४ टक्के वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. नोटबंदीचे विपरीत परिणाम आज उघड्या डोळ्याने दिसत आहे. सर्वसामान्यांच्या मनातील मुद्यांना हात घालून पंतप्रधानांनी बडे उद्योगपती, गर्भश्रीमंतांना नोटबंदीतून लाभ मिळवून दिला. या आरोपात तथ्य असल्याचे आज अनेकांना जाणवत आहे.नोटबंदीमुळे शंभरावर मृत्यू होऊन हळूहळू नोटबंदीचे परिणाम आता जाणवत गेले. प्रचंड यातना देखील भोगाव्या लागल्या आहेत. मात्र भाजपाचे समर्थक आणि मोदीभक्त खासगीत मोदींच्या नावाने शिमगा करीत आहेत. भाजप जनप्रतिनिधी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. फेसबुक, व्हॉटस अॅप व समाजमाध्यात येत असलेल्या कमेंटस्, लोकांच्या मनातील चीड सांगत आहे,

अर्थव्यवस्थेची अनेक क्षेत्रे यानिर्णयामुळे कोलमडून पडली आहे. नोटबंदीने काहीही साध्य होणार, असा अर्थशास्त्रज्ञांनी केलेला दावा खरा ठरला. तेव्हा नोटबंदीचा निर्णय गोतावळ्यांच्या राजकीय आणि आर्थिक सोयीसाठी तर नव्हता नां ? खास मर्जीतील काहींचा काळापैसा पांढरा करण्यासाठी तर ही योजना नव्हती ना? नोटबंदी आजपर्यंतचा या देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरणार असल्याचे, स्पष्ट होत आहे. नोटबंदीच्या काळात सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रभक्तीचा अलख जागवीणारे, मोदींना याबद्दल जाब विचारण्याचे धाडस करणार काय?

संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असून मध्यमवर्गीय आर्थिक झळानी होरपळून निघत आहे. सातत्याने गोबेल्स तंत्राचा वापर करीत देशवासीयांची दिशाभूल करणे सुरू असल्याची अनेक उदाहरण असून, ‘नोटबंदी’ हे भाजप सरकारच्या अपयशाचे स्मारक आहे.आज मोदींच्या ‘ब्लॅक मनी’ बलूनचा ७ व्या वर्धापन दिनानिमित्त एवढंच की, नोटबंदी अस्त्रांची शेवटी फलश्रुती काय? कोणी ठोस उत्तर शोधणार !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!