Saturday, July 27, 2024
HomeUncategorized'विराट' विक्रम ! कोहलीचे वन डे क्रिकेटमध्ये शतकांचे 'अर्धशतक' : मोडला सचिनचा...

‘विराट’ विक्रम ! कोहलीचे वन डे क्रिकेटमध्ये शतकांचे ‘अर्धशतक’ : मोडला सचिनचा विश्वविक्रम

अकोला दिव्य न्युज ब्युरो : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीची वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी हुकली होती. त्याने ईडन गार्डनवर ही बरोबरी केली, परंतु आज याच ऐतिहासिक वानखेडेवर विराटने सचिनचा विक्रम मोडला. त्याने वन डे क्रिकेटमधील पन्नासावे शतक झळकावले. 

विक्रमी शतक झळकावताच त्याने सचिनला मानाचा मुजरा केला. रोहित शर्माने २९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांची वादळी खेळी करून टीम इंडियाला पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर शुबमन गिलने दमदार फटकेबाजी केली, परंतु पायात गोळा आल्याने त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. त्याने ६५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी शतकी भागीदारी करताना न्यूझीलंडची अवस्था वाईट केली. विराटने आजच्या खेळीच्या जोरावर वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात एकाच पर्वात सर्वधिक ( ६७४+*) धावांचा विश्वविक्रम नावावर केला. तो वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात सर्वाधिक ८ वेळा फिफ्टी प्लस धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

श्रेयसने घरचे मैदान गाजवताना अप्रतिम षटकार खेचले आणि किवी गोलंदाज चेंडू सहजरित्या प्रेक्षकांमध्ये जात असल्याचे पाहत बसले. श्रेयसनेही अर्धशतक पूर्ण करताना विराटसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. वर्ल्ड कप उपांत्य फेरीत भारताच्या ३ किंवा त्याहून अधिक फलंदाजानी फिफ्टी प्लस धावा केल्याची ही पहिलीच वेळ ठरली. श्रेयसचे ही वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग चौथे अर्धशतक ठरले. ४०व्या षटकात एक धाव घेताना विराट पडला अन् अनुष्काच्या काळजाचा ठोका चुकला.

विराटने १०६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ऐतिहासिक पन्नासावे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करताच त्याने हवेत उडी मारली.. गुडघ्यावर बसून ग्लोव्ह्ज व हेल्मेट काढले… अनुष्काला फ्लाईंग किस दिला अन् नंतर सचिन तेंडुलकरला मानाचा मुजरा केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!