Saturday, June 22, 2024
Homeसंपादकियप्रत्येकच मूल गावगुंड नसते आणि प्रत्येकाला ‘देशद्रोही’ ठरवण्यातही अर्थ नसतो

प्रत्येकच मूल गावगुंड नसते आणि प्रत्येकाला ‘देशद्रोही’ ठरवण्यातही अर्थ नसतो

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : प्रेक्षक दालनातून उडी मारून संसदेच्या सभागृहात येणाऱ्या आणि ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत तथाकथित ‘कलर बॉम्ब’ उडवणाऱ्या तरुणांच्या ओठांवरचे हे शब्द ऐकून आपल्या देशाचे भवितव्य नेमके काय असेल ?असा प्रश्न देशातील तमाम सुशिक्षित युवकांच्या आई-वडिलांसमोर उभा राहिला असेल. असो, पण ही घटना खरोखर गंभीरच. लोकसभेच्या कडक सुरक्षाव्यवस्थेला भेदून २०-२२ वर्षांचे दोन तरुण संसदेच्या सभागृहात तर त्यांचे दोन साथीदार संसदेच्या परिसरात नळकांड्या फोडून रंगीत धूर पसरवतात आणि घोषणा देतात या प्रकाराला काय म्हणायचे ?हा नक्कीच पोरखेळ नव्हता आणि ‘धुरा’ला बॉम्ब म्हणावे इतका जीवघेणाही नव्हता. पण हीच मुले विशिष्ट धर्माची असती, तर कदाचित सगळेच काम ‘सोपे’ झाले असते. पण ही सगळी पोरे निघाली बहुसंख्याकवादी धर्मामधली. ती एकाच राज्यामधली निघाली असती, तरीही वेगळा रंग मिळाला असता. पण ती निघाली ‘द ग्रेट इंडियन मिडल क्लास’शी नाते सांगणारी.

नीट शिकली-सवरलेली. शिक्षण हेच त्यांचे मूल्य, तेच त्यांचे सामर्थ्य आणि तेच त्यांचे दु:खही.. त्यांच्या कृत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बेरोजगारीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी या पद्धतीने गदारोळ माजवला असावा असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर दहशतवादी कृत्य करणे आणि कट रचणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर पुढे व्हायची ती प्रक्रिया होईलही; पण बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातले दोनचार तरुण चुकीच्या मार्गानेच पण थेट संसदेच्या सभागृहात घुसत असतील तर आपण या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणार की नाही ?

एकीकडे आपला देश सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण तरुणांच्या हाताला काम नसेल, त्यांच्या रोजगाराच्या मागणीकडे लक्ष दिले जात नसेल, तर त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, माथी भडकून असं काही करु शकतो की, स्वतःसह कुटुंब आणि समाजव्यवस्थेला मोठी हानी पोहोचू शकतो, अर्थात बेरोजगारी हा काही आज निर्माण झालेला प्रश्न नाही. आपल्या देशाची लोकसंख्या, उपलब्ध रोजगार, साक्षरतेचे प्रमाण, इतर सामाजिक प्रश्न हे सगळे पाहता रोजगाराचा प्रश्न नेहमीच उग्र राहिला आहे.

पन्नासेक वर्षांपूर्वीची बेरोजगारी आणि आजची यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. एकीकडे इंटरनेटमुळे घरबसल्या होणाऱ्या जगाच्या दर्शनाने तरुणांच्या महत्त्वाकांक्षा वाढत आहेत. आणि दुसरीकडे आयुष्यामधली उमेदीची पंधराएक वर्षे शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत घालवल्यानंतरही हाताला काम मिळत नाही, बेरोजगाराचा शिक्का घेऊन जगावे लागते याचे शल्य आहे.. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चाललेले राजकारण बाजूला ठेवू; पण या मागणीसाठी गेली काही वर्षे सुरू असलेल्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा तरी दुसरे काय सांगतो? या पद्धतीने आपली ताकद दाखण्याची क्षमता नसलेल्या इतर जातीजमातींमधील तरुणांच्या मनात यापेक्षा वेगळे ते काय असणार ?

तरुणपणाला अस्वस्थपणाचा आणि आततायीपणाचा शाप असतो असे म्हटले जाते. आता वर, शाप, उ:शाप या कल्पना मानणे/ न मानणे हा वेगळा मुद्दा. पण तरुणांनी अस्वस्थ असलेच पाहिजे, कारण त्यांनाच तर उद्या घडवायचा असतो. भविष्याला आकार द्यायचा असतो. त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा, त्यांची रग उद्याचे जग घडवते किंवा बिघडवते, हे खरेच; पण त्या ऊर्जेला वाट करून द्यायची असते ती आधीच्या पिढीने-  धोरणकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी. त्यांना आपल्या तरुणांनी त्यांच्या अस्वस्थपणातून मंगळाच्या पुढच्या ग्रहावर जायची महत्त्वाकांक्षा बाळगणे अपेक्षित आहे की नोकरी मिळत नाही म्हणून रेल्वेचे डबे जाळणे अपेक्षित आहे?

त्यांना आपल्या तरुणांच्या अस्वस्थपणातून वेगवेगळया क्षेत्रांत नवनवी शिखरे पादाक्रांत व्हायला हवी आहेत की हाताला काम नाही म्हणून विध्वंसक अशी कृत्ये करावी, हा कळीचा प्रश्न उपस्थित होतो आहे. विद्यमान सरकार रोजगार मेळे घेऊन नोकरीची नियुक्तिपत्रे वाटत असल्याचे सरकारी माध्यमे सातत्याने दाखवत असली तरी त्या प्रयत्नांचा रेटा आणखी वाढवावा लागेल, कारण बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, संधींचा अभाव, गरिबी या दुष्टचक्रातून आजचा तरुण भरडून निघतो आहे. हे आजचे वास्तव या घटनेतूनही एक प्रकारे अधोरेखित झाले आहे. चारदोन तरुण वयाच्या अनुषंगाने येणाऱ्या जोशात एखादे आततायी कृत्य करतात त्याआधी चारेकशे जणांची तीच मानसिकता तयार झालेली असते, पण ते तेवढे बिथरलेले किंवा कृती करायला उद्युक्त झालेले नसतात, एवढेच. अशा वेळी गरज आहे ती त्यांना चुचकारण्याची.

चुकलेल्या मुलाला घरातले वडीलधारे भरतात तसे रागे भरण्याची. गरज पडली तर एखादी थप्पड देऊन नीट रस्ता दाखवण्याची. वाट चुकलेले,बिथरलेले प्रत्येकच मूल गावगुंड नसते आणि सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू पाहणाऱ्या प्रत्येकाला ‘देशद्रोही’ ठरवण्यातही अर्थ नसतो. आपण अलीकडे त्याच चष्म्यातून सगळय़ांकडे पाहू लागलो आहोत की काय, हे तपासण्याची खरे तर यानिमित्ताने गरज आहे. बेरोजगारी, कौशल्याचा आणि संधींचा अभाव, गरिबी या दुष्टचक्रात आजचा तरुण असल्याचे वास्तव संसदेतील ‘धूरहल्ल्या’ तूनही एक प्रकारे अधोरेखित झाले असून,

‘वर्तमानाला कळेना आमुची भाषा’ असे म्हणण्याची वेळ आपल्या तरुण पिढीवर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा, अन्यथा संसदेत निघालेला ‘धूरहल्ला ’ उद्या जर संसदेत खरोखरचा बॉम्ब स्फोटाचा हल्ला चढवला गेला तर… तर देशात अराजकता माजेल की नाही?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!