अकोला दिव्य न्युज ब्युरो : कंपनीचा कर कमी करून ‘ नील’ चे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना ३ लाखाची लाच देणारा उद्योजक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. प्रकरणी मलकापूरच्या दालमिल कंपनीच्या उद्योजकाविरुद्ध खामगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी व्यापाऱ्याने कर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या टेबलवर चक्क ३ लाख रुपये टेकवले. अधिकाऱ्याने इशारा करताच बाजूला असलेल्या पथकाने लगेच झडप घालून व्यापाऱ्यास ताब्यात घेतले. मलकापूरच्या व्यापाऱ्याने खामगाव ‘जीएसटी’ कार्यालयातील अधिकाऱ्याला लाच घेण्यासाठी वारंवार तगादा लावला. मात्र अधिकाऱ्याने जालना ‘एसीबी’ कडे तक्रार दिली. खामगाव येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचला.
प्रवीण मदनलाल अग्रवाल असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याची मलकापूर येथे बजरंग इंडस्ट्रीज नावाचा डाळ उद्योग आहे. दाल मिल कंपनीचे सन २०१७ -२०१८ वर्षातील कर २ कोटी ७७ लाख पर्यंत थकलेला आहे. त्यामुळे २४ जून २०२२ रोजी कर विभागाने व्यापाऱ्याला प्रथम नोटीस दिली. त्यानंतर वारंवार नोटीस देऊन कंपनीच्या मालकाने थकबाकी न भरल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये मालमत्ता जप्तीचे आदेश काढण्यात येईल असे कळविले. मात्र कर नसल्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व्यापाऱ्यने तीन लाख रुपये देण्याचे सांगून सहायक्क कर आयुक्त यांना लाच घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तक्रारदार लाच घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित व्यापाऱ्याची तक्रार दिली. सदरची कारवाई जालना ‘एसीबी’ चे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे, पोलीस कर्मचारी गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश भुजाडे, गणेश चेके यांनी केली.