Saturday, June 22, 2024
Homeअपघातप्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला; सभास्थळी धावपळ अन् गोंधळ…

प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला; सभास्थळी धावपळ अन् गोंधळ…

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन केले. मात्र, या सभेसाठी उभारलेल्या भव्य व्यासपीठाचा मागचा भाग (बॅकड्रॉप) लोखंडी अँगलसह अचानक कोसळला. हजारोंच्या गर्दी असलेल्या मैदानात या घटनेमुळे धावपळ झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर लगेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांनी  व्यासपीठाकडे धाव घेतली. मात्र, या भागात चित्रिकरण करण्यास काही कार्यकर्ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आठकाठी आणत होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता.

आज सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त स्त्रीमुक्ती दिन परिषद आयोजित केली. या परिषदेला अॅड. प्रकाश आंबेडकर, वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष निशा शेंडे शहरात दाखल झाल्या होत्या. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ ला जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याने त्यापूर्वी वंचितने स्त्रीमुक्ती परिषद आयोजित करून शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कस्तूरचंद पार्कवर भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून व्यासपीठाचे काम सलग सुरु होते. सोमवारी सकाळी व्यासपीठाचे उर्वरित काम पूर्ण झाले. व्यासपीठावर बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन होण्यापूर्वीच व्यासपीठाचा मागचा भाग (बॅकड्रॉप) लोखंडी अँगलसह कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली.

या घटनेमुळे एवढ्या मोठ्या मैदानात पळापळ झाली. या घटनेचे चित्रिकरण करण्यास गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांनी धाव घेतली असता काही कार्यकर्त्यांनी चित्रिकरण करण्यास मज्जाव केला. त्यानंतर काही वेळातच सुजात आंबेडकर यांनी व्यासपीठाच्या मागच्या बाजुला येऊन पाहणी केली. कोसळलेला भाग पूर्वरत करण्याच्या कामास सुरवात केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करीत वाद मिटविल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!